23 February 2019

News Flash

फ्लॅशबॅक : यश जोहर आणि देव आनंद

यश जोहर व देव आनंद नेमके कधी आणि कसे बरे एकत्र आले असा अनेकांना प्रश्न पडला असेल.

यश जोहर देव आनंदचे खूप जुने सहकारी.

दिलीप ठाकूर

चित्रपटसृष्टीतील पडद्यामागील घडामोडींची कल्पना असणार्‍याना या छायाचित्राचे फारसे आश्चर्य वाटणार नाही. पण यश जोहर व देवसाहेब नेमके कधी नि कसे बरे एकत्र आले असा इतरांना प्रश्न पडला असेल. यश जोहर निर्मित कोणत्याही चित्रपटात देव आनंद तर नव्हता. म्हणून त्यांनी असे एकत्र येऊ नये असे काही नाही. पण ही जोडी जमली यामागे बरेच संदर्भ आहेत. हे छायाचित्र देव आनंद निर्मित, दिग्दर्शित आणि अभिनीत ‘देस परदेस’ (१९७८)च्या रौप्य महोत्सवी सोहळ्यातील आहे. देव आनंद आपल्या नेहमीच्या सवयीनं स्टाईलमध्ये तोंडात फूल पकडून आहे. देव आनंद अगदी कुठेही असला तरी चैतन्यमय असतो असा प्रत्यय कायम येई. ‘देस परदेश’मध्ये त्याच्यासोबत टीना मुनिम, अमजद खान, प्राण, प्रेम चोप्रा, मेहमूद, डाँ. श्रीराम लागू, इंद्राणी मुखर्जी, पेंटल वगैरे वगैरे भली मोठ्ठी स्टार कास्ट होती. तरी चित्रपटाच्या मुहुर्तापासून ते अगदी त्याच्या यशाच्या पार्टीपर्यंत देवसाहेब छा गये.

यश जोहर देव आनंदचे खूप जुने सहकारी. किती व कसे? तर साठच्या दशकातील नवकेतन फिल्मच्या चित्रपटाच्या अनेक वैशिष्ट्यातील एक म्हणजे यश जोहर प्राँडक्शन कंट्रोलर. अर्थात निर्मिती व्यवस्थापक. ‘गाईड’, ‘ज्वेल थीफ’ या चित्रपटाच्या श्रेयनामावलीत यश जोहरना पडद्यावर एकट्याला स्थान देण्यात आलेले पाह्यला मिळते. विजय आनंदच्या दिग्दर्शनातील चित्रपटात असे मानाने स्थान मिळाले म्हणजे त्या व्यक्तीचे कामच दर्जेदार असणार हे स्पष्ट आहे. देव आनंद ‘प्रेम पुजारी’  (१९७०)पासून चित्रपट दिग्दर्शनात उतरला आणि यश जोहरची साथ कायम राहणार असल्याचे स्पष्ट होते आणि झालेही तसेच. अगदी खुद्द यश जोहर आपल्या धर्मा प्रॉडक्शन्सची स्थापना करून आपला पहिला चित्रपट ‘दोस्ताना’ (१९८०)ची निर्मिती करेपर्यंत ही साथ राहिलीच पण देव आनंद ज्यांच्या सहा चित्रपटात (मिलाप, सी. आय. डी., सोलवा साल इत्यादी) हीरो होता, त्या राज खोसला यांजकडे ‘दोस्ताना’चे दिग्दर्शन देत आपली व्यावसायिक निष्ठा आणि व्यक्तीगत बांधिलकी कायम ठेवली. अर्थात तो काळ वेगळाच होता, या चित्रपटसृष्टीतील माणसेही फिल्मी नव्हती.

First Published on July 13, 2018 1:05 am

Web Title: yash johar and dev anand flashback by dilip thakur