एकाच दिवशी दोन किंवा अधिक चित्रपट प्रदर्शित झाल्यास, त्याचा फटका कोणत्या तरी चित्रपटाला सहन करावाच लागतो. ख्रिसमसच्या निमित्ताने यंदा बॉलिवूडच्या किंग खानचा ‘झिरो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. शाहरुखच्या चित्रपटाला तशी स्पर्धा नव्हती पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका कन्नड चित्रपटाने त्याला मागे टाकलं आहे. ‘किंग ऑफ रोमान्स’ शाहरुखची जादू यावेळी चालली नाही.

दाक्षिणात्य अभिनेता यशची मुख्य भूमिका असलेल्या ‘KGF’ या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत ५९.७० कोटी रुपयांचा गल्ला जमवला तर शाहरुखच्या ‘झिरो’ने ५९.०७ कोटी रुपये कमावले. विशेष म्हणजे ‘KGF’ फक्त १८०० स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला तर ‘झिरो’ तब्बल ४८०० स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला.

वाचा : आई-वडिलांपेक्षा रणवीर मला जास्त घाबरतो- दीपिका 

शाहरुख, अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ अशी ‘झिरो’ चित्रपटाची स्टारकास्ट आहे. पहिल्या दिवशी हा चित्रपट घसघशीत कमाई करेल असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषकांनी वर्तवला होता. पण हा अंदाज साफ खोटा ठरला. पहिल्या दिवशी ‘झिरो’ने फक्त २०.१४ कोटी रुपये इतकाच गल्ला जमवला. ख्रिसमसला प्रदर्शित झालेल्या गेल्या तीन वर्षांतील हा सर्वांत कमी कमाईने ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे.

‘झिरो’ आणि त्याआधीचे दोन-चार चित्रपट पाहता आता बॉलिवूडच्या किंग खानची जादू ओसरत चालली आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. म्हणूनच कदाचित ‘झिरो’ हिट नाही झाला तर मला पुढील सहा ते दहा महिने काम मिळणार नाही अशी चिंता स्वत: शाहरुखलाही सतावत होती.