‘ये रे ये रे पैसा’ चित्रपटाच्या टीमने अमिताभ बच्चन यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी संपूर्ण टीमला बॉलिवूडच्या शहेनशहासोबत खास गप्पा मारता आल्या. परंतु, ये रे ये रे पैसाच्या बबलीकडे म्हणजेच तेजस्विनी पंडितकडे बिग बींसाठी एक खास गोष्ट दाखवण्यासारखी होती.

तेजस्विनीने आपल्या आईचा एक व्हिडिओ बिग बींना दाखवला पण, हा व्हिडिओ होता खास! कारण या व्हिडिओमध्ये तेजस्विनीच्या आईंसोबत म्हणजे ज्योती चांदेकर यांच्यासोबत खुद्द अमिताभ बच्चन होते. १९७२ साली प्रदर्शित झालेल्या बी आर इशारा दिग्दर्शित ‘एक नजर’ या चित्रपटात ज्योती चांदेकर यांनी अमिताभ यांच्या सावत्र आईची भूमिका साकारली होती. आणि त्या वेळेस त्या अवघ्या १६ वर्षांच्या होत्या. तेजस्विनी पंडितने बिग बींसोबतच्या या भेटीत त्यांना एक नजर चित्रपटातील एक व्हिडिओ क्लिपही दाखवली. या व्हिडिओत ज्योती चांदेकर आणि बिग बी यांचे संभाषण असलेले दृश्य होते. हा व्हिडिओ स्वतः ज्योती चांदेकर यांनी आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवरही पोस्ट केला आहे.

वाचा : …म्हणून विराट कोहली साखरपुड्याची अंगठी गळ्यात घालतो

स्वतःच्या आईचा व्हिडिओ अमिताभ यांना दाखवणे आणि त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येईल हे पाहणे, हे सगळं वर्णन करण्यासारखंच आहे. त्याबाबत तेजस्विनी म्हणाली, ‘मी हे फार आधी प्लॅन केलं होतं की जेव्हा मी अमिताभजींना भेटेन तेव्हा मी त्यांना माझ्या आईसोबतचा त्यांचा हा व्हिडीओ नक्की दाखवणार. माझ्या आईची पण ही खूप इच्छा होती. पण त्यांना भेटायला जाताना मी थोडी अस्वस्थ होते. बिग बींकडे एवढा वेळ असेल का? इतके मोठे कलाकार किती लोक त्यांना भेटत असतील. माझा हा व्हिडिओ पाहण्यात त्यांना कितपत रस असेल मला माहित नव्हते. म्हणून मी तिथे पोहचल्यावर ‘ये रे ये रे पैसा’ बाबतची चर्चा करून झाल्यावर त्यांची परवानगी घेतली. आणि मग त्यांना हा व्हिडिओ दाखवला. माझ्या आईने त्यांच्यासोबत एका चित्रपटात काम केलंय हे मी सांगितल्यावर त्यांना कौतुक वाटलं. त्यांना चित्रपटाचं नाव आठवत नव्हतं. पण हा एक सुंदर ‘नॉस्टॅल्जिया’ दिल्याबद्दल त्यांनी मला धन्यवाद म्हटलं. व्हिडिओ पाहून त्यांना आनंद झाला.’

वाचा : ‘न्यूड’बद्दलचे धुके निवळेल

तेजस्विनी पुढे म्हणाली, ‘मी त्यांना हेसुद्धा सांगितलं की माझे बाबा तुमचे फार मोठे चाहते होते. जेव्हा कुली चित्रपटाच्या शूटिंग वेळेस तुमचा मोठा अपघात झाला तेव्हा माझ्या बाबांनी सिद्धिविनायकाकडे साकडं घातलेलं. आणि तुम्ही बरे झालात तसे बाबा चालत सिद्धिविनायकाला गेले आणि सोन्याच्या दुर्वा गणपतीला अर्पण केल्या होत्या. आमची तेव्हा सोन्याच्या दुर्वा घेण्याइतकी आर्थिक परिस्थिती नव्हती, पण बाबा तुमचे खरंच फार मोठे फॅन होते. त्यांना हे ऐकून फार कौतुक आणि समाधान वाटलं.’