गेल्या काही वर्षांमध्ये वेब सीरिज विश्वात बऱ्याच घडामोडी पाहायला मिळाल्या. चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन विश्वाला चांगलीच टक्कर देत विविध वेब सीरिजने २०१७ मध्येही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. या नव्या पण तितक्याच कल्पक अशा मनोरंजन विश्वावर प्रेक्षकांचाही विश्वास बसल्यामुळे आता त्याच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नव्या दमाचे कलाकार चौकटीबाहेरच्या विषयांना हाताळण्याला प्राधान्य देत आहेत. अशा या वेब विश्वात यंदाच्या वर्षी काही वेब सीरिज विशेष लक्षवेधी ठरल्या. अशाच सीरिजचा आज आपण आढावा घेणार आहोत.

यो के हुआ ब्रो-
अपारशक्ती खुराणा आणि शमिता शेट्टी अशी स्टारकास्ट ‘यो के हुआ ब्रो’च्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. अपारशक्तीने ‘दंगल’ चित्रपटात साकारलेली भूमिका पाहता त्याचा फायदा ‘यो के हुआ ब्रो’लाही झाला हे नाकारता येणार नाही. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या दोन हरयाणवी मुलांभोवती या वेब सीरिजचे कथानक फिरले. मुली, प्रेम, सळसळतं रक्त आणि दंगामस्ती या साऱ्याच्या नादात या दोन होतकरु तरुणांना कारावसही भोगावा लागतो. नेमका कसा आहे त्यांचा हा प्रवास, याचेच रंजक चित्रण ‘यो के हुआ ब्रो’मधून करण्यात आले आहे.

स्टुपिड मॅन स्मार्ट फोन-
सुमित व्यासने हा ब्रिटीश रिअॅलिटी शो प्रस्तुत केला होता. दिवसेंदिवस स्मार्ट होऊ पाहणाऱ्यांसाठी हा रिअॅलिटी शो, काहीसा आव्हानात्मक होता. कारण, स्मार्टफोनच या कार्यक्रमात त्यांचा तारणहार ठरला होता.

बोस : डेड ऑर अलाइव्ह-
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनाभोवती फिरणारे बरेच चित्रपट, लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि प्रसिद्धी मिळवून गेले. पण, राजकुमार रावची मुख्य भूमिका असणारी ‘बोस डेड ऑर अलाइव्ह’ ही वेब सीरिज मात्र या साऱ्यात वेगळीच ठरली. हंसल मेहता दिग्दर्शित ही वेब सीरिज तरुणाईमध्येही बरीच चर्चेत होती.

राईज-
काहीतरी साध्य करण्यासाठी झपाटून, अगदी वेड लागल्याप्रमाणे काम करयणाऱ्या, ध्येयपूर्तीसाठी झटणाऱ्या तरुणाईचा एक महत्त्वाचा गुण हेरत २०१७ मध्ये प्रदर्शित झालेली आणखी एक वेब सीरिज म्हणजे, ‘राईज’. स्पोर्ट्स बाईक घेण्यासाठी एखाद्या यंत्राप्रमाणे काम करुन शेवटी एक तरुण ती स्पोर्ट्स बाईक घेतो खरा. पण, त्यानंतर मात्र त्याच्या आयुष्यात बऱ्याच अडचणी, वाढून ठेवलेल्या असतात. त्यावरही मात करत वडिलांच्या सांगण्यावरुन हा पठ्ठ्या ‘रोड ट्रीप’ला निघतो. तेही एका मध्यमवयीन, थोड्या जास्तच वयस्कर आणि अनोळखी व्यक्तीसोबत. त्याचा हा प्रवास नेमका त्याला कुठवर घेऊन जातो, याचं चित्रण ‘राईज’मध्ये करण्यात आलं आहे.

बिश्त प्लीज-
नेहमीच वेगवेगळ्या मुद्दयांवर भाष्य करणाऱ्या वेब सीरिजवर भर देणाऱ्या ‘टीव्हीएफ’ने यंदाच्या वर्षी ‘बिश्त प्लीज’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आणली. निधी बिश्त, अमोल पराशर यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या वेब सीरिजमध्ये निधी बिश्तने साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. ‘टीव्हीएफ’चा सर्वेसर्वा अर्णभ कुमारवर लैंगिक शोषणाला आरोप लागला असतानाच ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यामुळे एका अर्थी ‘टीव्हीएफ’साठी ती तारणहार ठरली.

इनसाइड एज-
क्रिकेट आणि मनोरंजन विश्वात असणारा दुवा आणि त्यात होणाऱ्या घडामोडी वेगळ्याने सांगण्याची काहीच गरज नाही. याच धर्तीवर भाष्य करणारी ‘इनसाइड एज’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या वेब सीरिजमध्ये रिचा चड्ढा, विवेक ऑबेरॉय, अंगद बेदी यांच्या मुख्य भूमिका होत्या.

व्हॉट द फोल्क्स (WTF!)-
काही कामानिमित्त पत्नीच्या घरी राहायला आलेल्या एका व्यक्तीभोवती ‘व्हॉट द फोल्क्स’ या वेब सीरिजचं कथानक फिरतं. अतरंगी कुटुंब आणि त्यातून घडत जाणारे प्रसंग, प्रासंगिक विनोद या गोष्टींमुळे ही वेब सीरिज अनेकांनाच हवीहवीशी वाटली. तरुणाईच्या जवळ जाणारी भाषा आणि पटणारे कथानक याचा आधार घेत २०१७ मध्ये ही वेब सीरिज खऱ्या अर्थाने लोकप्रिय ठरली.