सेलिब्रिटी ज्या कार्यक्रमांना जातात तेथे आपला असा वेगळा ठसा उमटवतात. अगदी त्याच्या स्टाईल स्टेटमेंटपासून ते माध्यमांच्या प्रश्नांना दिलेल्या उत्तरापर्यंत. सेलिब्रिटींची स्टाईल स्टेटमेंट बऱ्याचदा सर्वसामान्यांच्या वॉर्डरोबलाही एक वेगळाच टच देऊन जाते. अशाच काही अफलातून स्टाईल स्टेटमेंट २०१७ या वर्षातही पाहायला मिळाल्या. अगदी शाहिद कपूरपासून बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज होणाऱ्या सारा अली खानपर्यंत प्रत्येकानेच आपली अशी एक वेगळीच छाप सोडत यंदाच्या वर्षात अनेकांचं लक्ष वेधलं. बहुप्रतिष्ठीत ‘कान’ सोहळ्यापासून ते अगदी ‘फिल्मफेअर’च्या स्टाईल अवॉर्ड्सपर्यंत विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने सेलिब्रिटींच्या हटके स्टाईल पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली. त्यापैकीच काही बहुचर्चित लूक्सवर आज आपण नजर टाकणार आहोत.

‘कान’ महोत्सवात अनेक सेलिब्रिटी आपला ठसा उमटवत असतानाच ती आली तिने पाहिलं आणि तिने जिंकलं. ‘ती’ म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन. ‘कान’ महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी ऐश्वर्याकडे सर्वांच्याच नजरा वळल्या. निळ्या रंगाच्या गाऊनमध्ये ती ‘डिस्ने वर्ल्ड’मधील एखाद्या परीप्रमाणे दिसत होती. फॅशन एक्सपर्टकडूनही तिच्या या लूकचं कौतुक झालं. इतकंच नव्हे तर तिच्या या लूकची चर्चा वर्षभर सुरुच राहिली.


आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळा आणि कार्यक्रमांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्त्व करणारी आणखी एक अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. ‘ग्लोबल आयकॉन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियांकाने आता आंतरराष्ट्रीय कलाविश्वात आपले कायमचे स्थान निर्माण केले आहे. ही ‘देसी गर्ल’ प्रत्येक वेळी आपल्या लूकबाबत प्रयोगशील असते. याचीच झलक पाहायला मिळाली ‘मेट गाला २०१७’ च्या रेड कार्पेटवर. ‘मेट गाला’मध्ये ‘राल्फ लॉरेनच्या’ ट्रेन्च कोट गाऊनमुळे प्रियांकाचा लूक आणखीनच उठावदार दिसत होता. मुख्य म्हणजे प्रियांकाने घातलेला हा पायघोळ गाऊन जगातला सर्वात लांबलचक गाऊनही ठरला होता. याच ‘ट्रेन्च कोट गाऊन’च्या आधारे त्यात काही बदल करत फॅशन जगतातही बरेच प्रयोग झाल्याचे पाहायला मिळाले.

अभिनेत्रींप्रमाणेच अभिनेत्यांचे स्टाईल स्टेटमेंटही तरुणांमध्ये चर्चेचा विषय ठरले. यामध्ये शाहिद कपूर बऱ्याचदा प्रकाशझोतात आला. काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या ‘फिल्मफेअर ग्लॅमर अॅण्ड स्टाईल अवॉर्ड्स’मध्ये शाहिदच्या लूकमध्ये सर्वाधिक लक्ष वेधले ते म्हणजे त्याचे शूज. सोशल मीडियावर आपल्या शूजसोबत पोझ देणाऱ्या शाहिदचे फोटोही बरीच प्रसिद्धी मिळवून गेले. ‘डॉल्से अॅण्ड गब्बाना पोर्टोफिनो किंग १९८४ लेदर स्निकर्स’ने (Dolce & Gabbana Portofino King 1984 leather sneakers) शाहिदचा लूक पूर्ण केला होता. साहिल अनेजाने डिझाईन केलेल्या पोलो नेक टीशर्ट आणि सूटच्या लूकमध्ये शाहिदचा लूक आणखीनच उठावदार दिसत होता. वर्षभर स्निकर्सचा एकंदर ट्रेंड पाहता शाहिदने घातलेले स्निकर्सही लवकरच तरुणांमध्ये चर्चेत येतील असे म्हणायला हरकत नाही.

यंदाच्या वर्षी सेलिब्रिटी किड्स जास्त प्रमाणात प्रकाशझोतात राहिले. किंबहुना येत्या काळात त्यांचीच जास्त चर्चा होण्याची चिन्हं आहेत. त्यापैकी सर्वाधिक चर्चा झालेल्या दोन सेलिब्रिटी किड्स म्हणजे सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आणि श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर. सारा आणि जान्हवी नेहमीच नवनवीन लूकमध्ये दिसल्या. पण, सर्वात लक्षवेधी ठरला तो म्हणजे त्यांचा लखनवी कुर्ती, प्लाझो आणि जुतीमधला अगदी साधा लूक. सुंदर रंगसंगती असणारे सैलसर कुर्ते आणि त्याला साजेशे प्लाझो, जुती यांमुळे या दोन्ही स्टार किड्सच्या सौंदर्याची जास्त चर्चा झाली.

सणासुदीच्या दिवसांमध्येही २०१७ या वर्षी सेलिब्रिटींनी अस्सल देसी लूकला प्राधान्य दिले. त्याचीच झलक दिवाळीच्या धामधुमीत पाहायला मिळाली. या साऱ्यामध्ये सोशल मीडिया आणि कलाविश्वात अनेकांची पसंती मिळवून गेला तो म्हणजे अभिनेत्री आलिया भट्टचा हिरव्या रंगाचा सुरेख लेहंगा. वर्षभर बऱ्याच अभिनेत्री डिझायनर लेहंग्यामध्ये दिसल्या. त्यामध्ये हलकासा मॉडर्न टचही पाहायला मिळाला. लेहंगा या पारंपरिक पोषाखाला अशा प्रकारे प्रकाशझोतात आणण्यामागे सेलिब्रिटी फॅशन डिझायनर्सची तितकीच महत्त्वाची भूमिका आहे हे नाकारता येणार नाही.

सेलिब्रिटींच्या फॅशन ट्रेंडची चर्चा व्हावी आणि त्यात अभिनेत्री दीपिका पदुकोणचा उल्लेख झाला नाही असे फार क्वचितच. प्रत्येक कार्यक्रमात बॉलिवू़डची ही ‘मस्तानी’ ज्या शिताफिने वावरते ते पाहताना क्या बात असे शब्द आपोआपच आपल्या तोंडून बाहेर येतात. डिझायनर आणि पारंपरिक अशा दोन्ही प्रकारच्या वेशात दीपिका रेखीव दिसते. पण, काही दिवसांपूर्वी बनारसी साडीतील तिचा लूक या साऱ्यामध्ये अधिकच उठावदार ठरला होता. लाल रंगाच्या साडीवर असणाऱ्या सोनेरी नक्षीकामामुळे तिचे सौंदर्य आणखीनच खुलून आले होते. शालीना नाथानी या सेलिब्रिटी स्टायलिस्टने दीपिकाच्या लूकमध्ये स्पेशल टच दिला होता.

स्टाईल स्टेटमेंटच्या यादीत आणखी एक अभिनेत्री म्हणजे अनुष्का शर्मा. एअरपोर्ट लूक म्हणा किंवा एखाद्या चित्रपटाचं प्रमोशन, अनुष्का नेहमीच नवनवीन लूकमध्ये पाहायला मिळते. मुख्य म्हणजे बदलत्या ऋतूचक्राप्रमाणे आपल्या वॉर्डरोबमध्येही ती बदल करताना पाहायला मिळाले.

सेलिब्रिटींच्या ट्रेंडिंग स्टाईल स्टेटमेंटमध्ये अभिनेता शाहरुख खानच्या ‘कॅमोफ्लाज प्रिंट’वरील प्रेमाला कसं विसरुन चालेल? यंदाच्या वर्षी शाहरुख बऱ्याच कार्यक्रमांना, या कॅमोफ्लाज प्रिंटचे कपडे घालून गेल्याचे पाहायला मिळाले. त्याच्याशिवाय इतरही बऱ्याच सेलिब्रिटींनी या लूकचा प्रयोग करुन पाहिला.

२०१७ या वर्षात बहुविध कारणांनी सतत बदलणारे, ट्रेंडमध्ये येणारे आणि जाणारे बरेच स्टाईल स्टेटमेंट पाहायला मिळाले. वरील काही स्टेटमेंट त्यातीलच काही उदाहरणं आहेत. पण, अशी आणखी एक स्टारकिड उरली आहे. जिच्याशिवाय ही यादी पूर्णच होऊ शकत नाही. ती स्टारकिड म्हणजे सुहाना खान. बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज होऊ पाहणारी सुहाना सेलिब्रिटींच्या वर्तुळात अगदी सहजतेनं वावरताना दिसतेय. त्यातही तिच्या लूककडे फक्त चाहत्यांच्याच नाही, तर फॅशन जगतातील अनेकांच्याच नजरा असल्याचं पाहायला मिळालं. यंदाच्या वर्षी सुहानाने ‘अर्थ रेस्तराँ’च्या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी घातलेल्या ‘हर्व लेजर’चा टॅन्जेरीन बॉडी हगिंग ड्रेसमुळे अनेकांची दाद मिळवली. या ड्रेसमध्ये ती कोणा एका आघाडीच्या अभिनेत्रीहून कमी दिसत नव्हती. २०१७ या वर्षात आणखीही बरेच स्टाईल स्टेटमेंट ट्रेंडमध्ये आले आणि गेले, पण त्यातील काही मात्र अनेकांच्या मनात कायमचे स्थान मिळवून गेले. तेव्हा आता येत्या वर्षात कोणते कलात्मक आणि अफलातून प्रयोग पाहायला मिळता हे जाणून घेणं औत्सुक्याचं ठरेल.