18 October 2018

News Flash

Year End 2017 Special : प्रियांका, ऐश्वर्याला मागे टाकत सनीच ठरली बहुचर्चित सेलिब्रिटी

जाणून घ्या कोण आहेत सोशल मीडियावर सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या महिला

सर्वाधिक सर्च केलेल्या सेलिब्रिटी महिलांच्या यादीत मागच्या वर्षीही सनीच अग्रस्थानी होती.

यंदाच्या वर्षात बऱ्याच घडामोडी घडल्या असून, त्यामुळे काही व्यक्तीही प्रकाशझोतात आल्या. या वर्षाचा अखेरचा महिना उजाडला असून, सध्या सरत्या वर्षांत नेमक्या कोणत्या घटना आणि व्यक्ती प्रकाशझोतात राहिल्या याविषयीच्या चर्चा सुरु आहेत. याची सुरुवात करणार आहोत २०१७ मध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या गेलेल्या भारतीय महिला सेलिब्रिटींपासून. ‘याहू इंडिया’ने २०१७ मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या महिला सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. या यादीत आघाडीवर आहे बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी. प्रियांका चोप्रा, ऐश्वर्या राय बच्चन यांनाही मागे टाकत सर्वाधिक सर्च केलेल्या सेलिब्रिटींमध्ये सनीच अग्रस्थानी आहे.

१. सनी लिओनी : सनी लिओनी यावर्षी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. २०१६ मध्येही सर्वाधिक चर्चेत असलेल्या सेलिब्रिटींमध्ये सनी पहिल्या स्थानी होती. यावर्षी जूनमध्ये लातूरच्या मुलीला दत्तक घेत तिने सर्वांनाच थक्क केलेलं. निशाला दत्तक घेतल्यापासून सनी जोरदार चर्चेत असल्याचं पाहायला मिळालं.

२. प्रियांका चोप्रा : बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही छाप पाडणारी ‘देसी गर्ल’ अर्थात प्रियांका चोप्रा यावर्षी चर्चेत असण्यामागे बरीच कारणे आहेत. याच वर्षी तिने ‘बेवॉच’ या चित्रपटात भूमिका साकारत हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ‘फोर्ब्स’ मासिकाच्या १०० सर्वांत शक्तिशाली महिलांच्या यादीतही तिने स्थान मिळवले. ‘पर्पल पेबल पिक्चर्स’ या तिच्या निर्मिती संस्थेनेही उल्लेखनीय कामगिरी केली. ‘पर्पल पेबल पिक्चर्स’ निर्मित ‘व्हेन्टिलेटर’ या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. त्यासोबतच ‘मेट गाला २०१७’, ‘एम्मी २०१७’ आणि ‘ऑस्कर’ या पुरस्कार सोहळ्यांमध्ये तिच्या उपस्थितीचीही सर्वाधिक चर्चा झाली.

3. ऐश्वर्या राय बच्चन : ‘कान फिल्म फेस्टिव्हल २०१७’मध्ये ऐश्वर्या राय बच्चन हिने दिमाखदार हजेरी लावलेली. पण यावर्षी विशेष चर्चा होण्यामागचं कारण तिची मुलगी आराध्या ठरली. त्याचप्रमाणे तिचा आगामी चित्रपट ‘फन्ने खान’मुळेही ती चर्चेत आहे. या चित्रपटात बऱ्याच वर्षांनी अनिल कपूर आणि ऐश्वर्या एकत्र काम करणार आहेत.

४. कतरिना कैफ : सोशल मीडियावर सक्रिय नसलेल्या कतरिनाने या वर्षाच्या सुरुवातीला इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. इन्स्टाग्रामवर तिने पोस्ट केलेले फोटो आणि व्हिडिओ यांचीच सर्वाधिक चर्चा झाली. त्यानंतर पूर्वाश्रमीचा प्रियकर रणबीर कपूरसोबत ‘जग्गा जासूस’ या चित्रपटात ती झळकली. हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर यशस्वी ठरला नसला तरी रणबीर- कतरिनाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना फार आवडली. वर्षाच्या अखेरीस कॅट सलमान खानसोबत ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पाच वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याने चाहत्यांमध्येही चित्रपटाची प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.

५. दीपिका पदुकोण : २०१७ हे वर्ष दीपिका पदुकोणसाठी संमिश्र अनुभवांचे राहिले, असं म्हणावं लागेल. सर्वाधिक सर्च केलेल्या सेलिब्रिटींच्या यादीत तिने पाचवं स्थान पटकावलं आहे. प्रियांकानंतर दीपिकानेही याच वर्षी हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘xXx : रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटात तिने भूमिका साकारलेली. इतकंच नाही सर्वाधिक मानधन घेणाऱ्या बॉलिवूड कलाकारांच्या यादीत दीपिकाने तिसरं स्थान पटकावलं. वर्षाअखेर सर्वाधिक चर्चा होत आहे तिच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटाची. या चित्रपटाच्या प्रदर्शनाचीही चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

६. करिना कपूर खान : करिना कपूर चर्चेत राहण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे तिचा मुलगा तैमुर अली खान. तैमुरचं स्टारडम हे कोणत्याही सुपरस्टारपेक्षा कमी नाही. मुलाच्या जन्मानंतर करिना चित्रपटांमध्ये पुनरागमन करतेय. ‘वीरे दी वेडिंग’ हा तिचा आगामी चित्रपटसुद्धा चांगलाच चर्चेत आहे.

७. ममता कुलकर्णी : बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी यावर्षी सर्वाधिक चर्चेत असलेल्या सेलिब्रिटींच्या यादीत सातव्या स्थानावर आहे. अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी ममता आणि तिचा पती विकी गोस्वामी चर्चेत राहिले. २००० कोटी रुपयांच्या इफेड्रीन तस्करीप्रकरणी हे दोघेही आरोपी आहेत. अमेरिकेच्या ड्रग एन्फोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशनने DEA फेब्रुवारीमध्ये विकी गोस्वामी आणि त्याच्या तीन साथीदारांना केनियातून अटक केली होती.

८. दिशा पटानी : अभिनेत्री दिशा पटानी तिच्या चित्रपटांपेक्षा कथित प्रियकर टायगर श्रॉफसोबत झळकल्यामुळेच सर्वाधिक चर्चेत राहिली. टायगर- दिशाचे डिनर डेट्स त्यासोबतच विविध कार्यक्रमांमध्ये रेड कार्पेटवरील तिचा लूक, सोशल मीडियावर तिच्या डान्सचे व्हिडिओ या सर्वांमुळे दिशा सतत प्रकाशझोतात राहिली. टायगरसोबत ती लवकरच ‘बागी २’ या चित्रपटात भूमिका साकारणार आहे.

९. काव्या माधवन : प्रसिद्ध अभिनेता दिलीपची पत्नी आणि मल्याळम अभिनेत्री काव्या माधवन या यादीत नवव्या स्थानावर आहे. एका दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या अपहरण आणि लैंगिक शोषणप्रकरणी काव्या बरीच चर्चेत होती. या प्रकरणातील संशयित आरोपीने काव्याकडून पैसे मिळाल्याचे सांगितल्यानंतर तिचं नाव पुढे आलं होतं.

१०. इशा गुप्ता : अभिनेत्री इशा गुप्ता सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या टॉप १० सेलिब्रिटींच्या यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली. यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे तिचे हॉट फोटोशूट. बोल्ड फोटोशूटमुळे तिला सोशल मीडियावर टीकांचा सामनादेखील करावा लागला होता. मात्र, या टीकांना न जुमानता इशा सोशल मीडियावर बोल्ड फोटो पोस्ट करतच राहिली.

First Published on December 7, 2017 2:46 pm

Web Title: year end 2017 special most searched female celebrities 2017 sunny leone tops yahoo india list priyanka chopra and aishwarya rai follow