दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंग भवनानी या दोघांचा विवाहसोहळा इटलीत पार पडला. बॉलिवूडमधल्या सर्वात लोकप्रिय जोडप्याच्या लग्नाची उत्सुकता त्यांच्या तमाम चाहत्यांना होती. अखेर पारंपरिक सिंधी आणि कोंकणीपद्धतीनं मोजक्याच कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्या दोघांचाही विवाहसोहळा पार पडला. रणवीर आणि दीपिकानं त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर जगभरातील चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. रणवीरचे वडील जगजीत सिंग भवनानी यांनी देखील अनोख्या अंदाजात आपल्या सूनेचं भवनानी कुटुंबात स्वागत केलं.

दीपिका-रणवीरचा गाजलेला चित्रपट ‘बाजीराव- मस्तीनी’ चित्रपटातील ये दीवानी मस्तानी हो गयी हे गाणं थोड्या हटके अंदाजात गात जगजीत यांनी भवनानी कुटुंबात दीपिकाचं स्वागत केले. ‘ये दीवानी तो भवनानी हो गई’ असं म्हणत त्यांनी जोडप्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. गेल्या सहा वर्षांपासून दीपिका आणि रणवीर एकमेकांना डेट करत आहेत. राम-लीला चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान या दोघांचीही प्रेमकहाणी सुरू झाली. १४ आणि १५ नोव्हेंबरला या दोघांनीही इटलीतील आलिशान व्हिलामध्ये लग्नगाठ बांधली.

याच आठवड्यात दीपिका आणि रणवीर मुंबईत परतणार आहे. २८ नोव्हेंबरला त्यांनी मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये मित्र मंडळींसाठी रिसेप्शनचं आयोजन केलं आहे.