गेल्या एक वर्षापासून देशात कोरोनाचं थैमान सुरु आहे. दुसरीकडे करोना निर्बंधांमुळे सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच बॉलिवूड आणि टीव्ही क्षेत्रातील कलाकारांवर सुद्धा बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. यातील एक ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेते संजय गांधी सध्या बेरोजगार झाले आहेत. गेल्या एक वर्षापासून अभिनेते संजय गांधी अत्यंत हालाखीचे दिवस काढत आहेत. हाताला काम नसल्यामुळे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत सुरू आहे, यामुळे संजय गांधी खूपच दुःखी झाले आहेत.

अभिनेता संजय गांधी यांनी नुकतीच दिलेल्या एका मुलाखतीत ते बेरोजगार झाल्याची कबुली दिली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, “करोनामुळे कित्येक कलाकार घरी बसले आहेत, त्यांच्याकडे कोणतंच काम नाही,जे रोल दिले जातात त्यांची रक्कम तुटपंजी असते. ”

अभिनेता संजय गांधी यांनी आपलं दुःख व्यक्त करताना सांगितलं, “प्रत्येक दिवशी आजुबाजुला कोणी ना कोणी करोनामुळे मृत्यू पावल्याची बातमी कानावर पडतेय…लोक आर्थिक संटकात आहेत, त्यांना मदत करण्याची माझी खूप इच्छा आहे, पण मीच स्वतः आर्थिक संकटात सापडलोय. मी श्रीमंत नाही, माझे सध्या हालाखीचे दिवस सुरू आहेत…जुलै २०२० पासून नागिन ४ नंतर मला कोणतंच काम मिळालं नाही..मी सध्या भाड्याच्या घरात राहतोय आणि प्रत्येक महिन्याचा खर्च डोक्यावर आहे…आता हाताला कामच नसल्यामुळे पैसे आणि भविष्य याचे काहीच प्लॅन्स सध्या तरी नाहीत.”

यापुढे संजय गांधी म्हणाले, “करोनामुळे मी माझ्या मित्रांना देखील भेटता येत नाही. मी सध्या व्यवस्थित आहे, पण उद्या भविष्यात काय होईल हे कोणी पाहिलंय…मला माझी काळजी घ्यायची आहे..आणि घर चालवण्यासाठी घराबाहेर पडावंच लागणार आहे…यात धोका आहेच, पण याला पर्याय पण नाही… ”

अभिनेता संजय गांधी यांनी यापूर्वी टीव्ही मालिकांव्यतिरिक्त ‘नो स्मोकिंग’, ‘उडान’, ‘अब के बरस’ आणि ‘रेस 2’ या चित्रपटांत सुद्धा काम केलंय.