सिनेमा, सौजन्य – 
‘स्पेशल’ मुलांबाबत एकंदरीत समाजाचा दृष्टिकोन सकारात्मक असतो का? या ‘स्पेशल’ मुलांमध्ये काही अंगभूत गुण असतात. त्याआधारे ते अशक्य गोष्टींवरदेखील मात करतात. आगामी ‘Yellow’ चित्रपटातून हे दाखविले आहे.
आजच्या स्पध्रेच्या जगात प्रत्येक पालकाच्या आपल्या मुलाबद्दल खूप काही अपेक्षा असतात. आयुष्यातील वेगवेगळ्या समस्यांना तोंड देण्यासाठी आपलं मूल कायम सक्षम असावं याविषयी पालकांचा कमालीचा आग्रह असतो. आपल्याला जे जमलं नाही ते आपल्या मुलामुलींनी करून दाखवावं असं त्यांचं स्वप्न असतं. असं स्वप्न असण्यात काही वावगं आहे असंही नाही, पण आपल्या पोटी जन्माला आलेलं मूल हे एक ‘स्पेशल’ मूल असेल तर मात्र एकंदरीत समाजाचा त्यांच्या विषयीचा दृष्टिकोन सकारात्मक असतो का, हा मुख्य प्रश्न आहे. या ‘स्पेशल’ मुलांच्या अत्यंत भावनिक आणि संवेदनशील अशा विषयावर लवकरच एक मराठी चित्रपट येतोय ज्याचं नाव आहे ‘ी’’६’. ‘बालक-पालक (बी-पी)’ चित्रपटाच्या भव्य यशानंतर निर्माते अभिनेते रितेश देशमुख आणि उत्तुंग ठाकूर यांच्या विवा इन एन आणि मुंबई फिल्म कंपनीची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन करतोय. िहदी-मराठी चित्रपटसृष्टी आणि जाहिरात जगतातील आजचा आघाडीचा छायाचित्रकार ‘दबन्ग’, ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’ आणि ‘बालक-पालक’ फेम महेश लिमये. चित्रपटाचं कथानक एका सत्य घटनेवर आधारित असून या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, मनोज जोशी आणि उपेन्द्र लिमये यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तर हृषीकेश जोशी आणि ऐश्वर्या नारकर हे कलाकारही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. महेश लिमये यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच प्रयत्न असणार आहे.
चित्रपटाचा विषय फारच संवेदनशील असल्यामुळे चित्रपटासाठी संशोधनाची खूपच गरज होती. यासाठी ‘स्पेशल’ मुलांचं आणि त्यांच्या पालकांचं एक वेगळं विश्व, ज्याची आपल्यासारख्या सामान्य लोकांना कल्पनाही करता येत नाही ते विश्व खऱ्या अर्थाने समजावून घेण्याची गरज होती. महेश लिमये म्हणतात, ‘आमचे लेखक अंबर हडप आणि गणेश पंडित यांनी या विषयावर फारच सखोल अभ्यास केला होता. त्यांनी केलेलं संशोधन इतकं मूलभूत होतं की त्यामुळे या विषयाला कशा पद्धतीने हाताळणं गरजेचं आहे हे मला कळण्यास खूपच मदत झाली. त्यांनी जेव्हा मला कथा ऐकवली आणि मला चित्रपट दिग्दíशत कराल का असं विचारलं, तेव्हा ती कथा ऐकून मी सुन्नच झालो. चित्रपट हे खूपच प्रभावी माध्यम आहे आणि अशा विषयावर चित्रपट बनवून याद्वारे आपल्याला जर कुणाला प्रेरणा देता आली तर किती चांगलं होईल असा विचार माझ्या मनात आला आणि मी लगेच दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली. ’

अशा ‘स्पेशल’ मुलांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची सामाजिक मानसिकता आपल्याकडे अजूनही म्हणावी तेवढी विकसित झालेली नाही. आम्ही त्यांना ‘स्पेशल’ मूल न मानता त्यांच्याकडे एक सामान्य माणूस म्हणूनच बघितलं, कारण जर का आपण अशा मुलांचे अंगभूत गुण हेरले तर त्यांना आयुष्यात काहीही करणं अशक्य नाही हेच सांगायचा प्रयत्न आम्ही या चित्रपटाद्वारे करत आहोत. 
दिग्दर्शक : महेश लिमये

चित्रपटाची कथा गौरी या ‘स्पेशल’ मुलीच्या भोवती फिरते. आपल्या आयुष्यात आपल्या मुलीचा आहे तसा स्वीकार करणं तिच्या वडिलांना (मनोज जोशी) जमत नाही तेव्हा तिची आई (मृणाल कुलकर्णी) आपल्या मुलीला पूर्णपणे समजावून घेऊन तिला तिच्या अंगभूत क्षमता विकसित करण्यास मदत करते. जलतरण या क्रीडा प्रकारातील गौरीचं टॅलेण्ट हेरून तिचा कोच (उपेन्द्र लिमये) तिला आपलं ध्येय साध्य करण्यासाठी प्रोत्साहित करतो आणि नंतर गौरी या क्रीडा प्रकारात स्वत:चे असामान्य कर्तृत्व सिद्ध करते अशी ही कथा. चित्रपटाच्या पटकथेमध्ये गरजेनुसार बदल केलेले असले तरीही कथेचा मुख्य गाभा हा सत्यकथेवर आधारित आहे. सामाजिक प्रश्नावर भाष्य करणारा चित्रपट नकळतपणे कधीकधी खूपच गंभीर होण्याचा धोका असतो. पण या चित्रपटात दिग्दर्शकाला पडद्यावर जे मांडायचं आहे ते अतिशय सहजपणे सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. कथा जरी हृदयस्पर्शी असली तरी त्यातून इतरांना प्रेरणा मिळत राहावी हा या चित्रपटाचा मुख्य उद्देश आहे.
गौरीच्या मध्यवर्ती भूमिकेसाठी कलाकारांची निवड करण्याची शोधमोहीम चालू होती. एक छोटय़ा वयाची आणि एक मोठय़ा वयाची अशा दोन कलाकारांची त्यासाठी गरज होती, पण जेव्हा महेशची प्रत्यक्ष गौरीची भेट झाली तेव्हा तिची निरागसता पाहून महेशला तीच या भूमिकेसाठी योग्य आहे असं वाटलं आणि त्याने तिलाच या भूमिकेसाठी तयार करण्याचं ठरवलं. प्रत्यक्ष सेटवर तिच्याकडून काम करून घेणं हे सुरुवातीला सर्वानाच एक मोठं आव्हान वाटलं होतं तरीही सर्वच कलाकारांनी गौरीला काम करताना खूपच सहकार्य केलं. महेश म्हणतो, या अनुभवी दिग्गज कलाकारांनी गौरीसोबत प्रचंड चिकाटीने, अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आणि अतिशय समरसून काम केलं त्यामुळे माझं काम खूपच हलकं झालं.
एक उत्तम छायाचित्रकार असल्यामुळे महेश लिमयेच्या या दिग्दर्शकीय प्रयत्नाचा लुक उत्तम असण्याबद्दल शंका घेण्याचं काहीच कारण नाही, पण चित्रपटाच्या निर्मितीची प्रक्रिया विषयनिवडीच्या गांभीर्यामुळे तशी आव्हानात्मक होती. चित्रपटात गौरी एक जलतरणपटू असल्याचं दाखवलं असल्यामुळे चित्रपटाच्या बऱ्याचशा भागांचं चित्रीकरण जलतरण तलावामध्ये करण्यात आलंय. तर बाकी भाग वसई, पुणे तसेच बँकॉकला चित्रित करण्यात आलाय. निर्माते रितेश देशमुख आणि उत्तुंग ठाकूर यांनी चित्रपटाच्या निर्मितिमूल्यांमध्ये कुठेही कमी ठेवायची नाही हे ठरवलेलं असल्यामुळे त्याचा परिणाम पडद्यावर दिसतो. या निर्मात्यांनी खूपच खुली सूट दिल्यामुळेच मी उत्तम काम करू शकलो हे महेश आवर्जून सांगतो. या चित्रपटाची गीतं लिहिली आहेत गुरू ठाकूर याने तर संगीत दिग्दर्शन केलंय कौशल इनामदार याने तर संकलन केलंय जयंत जठार याने.

माझ्यासाठी ही भूमिका म्हणजे एक वेगळं आव्हान होतं. अशा स्पेशल मुलासोबत २४ तास एकत्र राहून काम करणं कसं जमेल याची सुरुवातीला मला थोडी काळजी वाटत होती. पण एकदा त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण झाल्यानंतर सर्व सोपं होत गेलं. या मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे, त्यांची अंगभूत कौशल्ये आहेत. विशेषकरून त्यांच्या पालकांचा दृष्टिकोन खूपच सकारात्मक आहे, यासाठी मला अशा सर्व पालकांचं विशेष कौतुक करावसं वाटतं. अशा स्पेशल मुलांच्या या चित्रपटातून मी एक गोष्ट शिकले, ती म्हणजे आयुष्यात कुठल्याही छोटय़ाछोटय़ा गोष्टींची तक्रार करत बसायचं नाही.
मृणाल कुलकर्णी

या गतिमंद मुलांचं भावविश्व समजून घेणं खरं म्हणजे प्रत्येकासाठी एक मोठं शिक्षण असतं. चित्रपटाच्या लेखकांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. चित्रपटाचे एक लेखक अंबर हडप सांगतात, ‘‘आम्ही संशोधन करत असताना अनेक शाळांना भेटी दिल्या, अनेक गतिमंद मुलांना आणि त्यांच्या पालकांना भेटलो. या भेटीदरम्यान एक लक्षात आलं की, या मुलांच्या दृष्टीने जग हे खूप सुंदर आहे, आणि ती मुलं आपल्या जगात खूप आनंदी असतात. त्यांचा हा दृष्टिकोन चित्रपटाद्वारे दाखवता आला तर खूप चांगलं होईल असं वाटलं आणि त्या दृष्टीनेच आम्ही लिखाण केलं आहे.
तर दुसरे लेखक गणेश पंडित सांगतात, ‘‘आपल्या मुलांबद्दल अनेक पालकांचा दृष्टिकोन खूपच सकारात्मक होता, त्यांच्या घरात आपल्या मुलांसाठी मनमोकळं वातावरण असायचं हे सर्व पाहून सुखद धक्काच बसला, पण या निमित्ताने आम्हाला एक वेगळंच जग अनुभवायला मिळालं, तेच आम्ही लिखाणातून मांडण्याचा प्रयत्न केलाय.’’

आपण या मुलांकडे कसं बघतो यापेक्षा ही मुलं आपल्याकडे कसं बघतात हे या चित्रपटाद्वारे आपल्याला कळण्यास नक्कीच मदत होईल.

या स्पेशल मुलांमध्ये स्वार्थीपणाचा कुठलाही अभिनिवेश या मुलांकडे नसतो. आपल्या स्वत:च्या जगात वावरत ही मुलं जगण्याचा खराखुरा आनंद लुटत असतात. आपण या मुलांकडे कसं बघतो यापेक्षा ही मुलं आपल्याकडे कसं बघतात हे या चित्रपटाद्वारे आपल्याला कळण्यास नक्कीच मदत होईल. मुळात या मुलांकडून काही अपेक्षा ठेवण्यापेक्षा त्यांना आहे तसं स्वीकारणं जास्त महत्त्वाचं आहे हेच येथे सांगण्याचा प्रयत्न केला गेलाय. स्पेशल मुलांच्या काही पालकांना आपल्या मुलांनी स्वतंत्रपणे स्वत: आपल्या पायावर उभं राहावं असं सतत वाटत असतं, कारण आपण गेल्यानंतर आपल्या मुलांचं काय होईल याची चिंता त्यांना सतावत असते. त्यामुळे पूर्ण समाजाने जर ही चिंता थोडीफार दूर केली आणि या मुलांकडे सकारात्मकदृष्टय़ा पाहिलं तर ही मुलंही अतिशय सर्वसामान्य आयुष्य जगू शकतील. गतिमंद ठरवून समाजाने लेबल लावलेली ही सर्व मुलं कुठल्याच बाबतीत कमी नसतात, त्यांना गरज असते ती प्रेमाची आणि आपुलकीच्या भावनेची आणि तेच जास्त महत्त्वाचं आहे. ‘Yellow’ हा जीवनाकडे नव्याने पाहायला शिकवणारा स्पेशल चित्रपट आहे. चित्रपटाच्या शीषर्कातून या मुलांना एक स्पेशल ओळख मिळणार आहे. अर्थात दिग्दर्शकाला शीषर्कातील स्पेशल ओळख आताच सांगायची नाही. त्यासाठी २८ मार्चपर्यंत थांबावे लागेल.