16 January 2019

News Flash

‘पॅडमॅन चॅलेंज’वर मल्लिका दुआने ओढले ताशेरे

'यात तुम्हाला महिलांचं सक्षमीकरण केल्यासारखं वाटतं....'

अक्षय कुमार, मल्लिका दुआ

बऱ्याच चर्चा आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलल्यानंतर अखेर ‘पॅडमॅन’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा यासाठी चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करण्यात येतं. चित्रपट प्रसिद्धीच्या विविध तंत्रांचा यात वापर होतो. अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’ चित्रपटाविषयीसुद्धा अशाच काही हटके मार्गांनी मासिक पाळीचा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवला गेला. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘पॅडमॅन चॅलेंज’ही दिलं. ज्याच्याअंतर्गत हातात सॅनिटरी पॅड घेऊन सेलिब्रिटींसह अनेकांनीच त्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.

खिलाडी कुमारने सुरु केलेल्या या हॅशटॅगचा ट्रेंडही पाहायला मिळाला. सॅनिटरी नॅपकीन, मासिक पाळी याविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी सुरु केलेल्या या चॅलेंजमध्ये फक्त महिलाच नाही तर, पुरुषांनीही सहभाग घेतला. पण, खिलाडी कुमारने उचललेलं हे पाऊल अभिनेत्री, युट्यूबर मल्लिका दुआला मात्र पटलं नाही. मल्लिकाने सोशल मीडियावरुन त्याविषयीची नाराजी व्यक्त केली.

सोशल मीडियावर एक पोस्ट करत तिने लिहिलं, ‘तुम्ही ज्यावेळी स्वत:ला कमकुवत समजता तेव्हा मुळात तुम्ही सर्वांइतकेच सक्षम असता हे नेहमी लक्षात ठेवा. ज्यावेळी तुम्हाला वाटेल की सरकार, समाजाने आपली भूमिका बजावलेली नाही याची आणि तुम्ही स्वत: कमकुवत असण्याची जाणीव होते, तेव्हाच तुमची एक वेगळी लढाई सुरु होते, असं समजा. एक सॅनिटरी पॅड हातात घेऊन तो फोटो काढून इन्स्टाग्रामवर शेअर करणं यात तुम्हाला महिलांचं सक्षमीकरण केल्यासारखं वाटतं….’

वाचा : Padman Movie Review : सुरुवातीला भरकटणारा, पण क्षणार्धात सूर पकडणारा ‘पॅडमॅन’

मल्लिकाने मांडलेली ही भूमिका पाहता आता यावर खिलाडी कुमार किंवा त्याची पत्नी, ट्विंकल खन्ना यावर काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मल्लिका आणि अक्षयमध्ये असणाऱ्या नात्यात काही महिन्यांपूर्वी मीठाचा खडा पडला होता. एका कार्यक्रमादरम्यान खिलाडी कुमारने मल्लिकाला उद्देशून केलेल्या वक्तव्यानंतर तिने त्याच्यावर आगपाखड केली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या या वादाला बरीच हवा मिळाली होती. फक्त खिलाडी कुमारच नव्हे, तर ट्विंकल खन्नानेही या वादात उडी घेतली होती.

 

First Published on February 9, 2018 1:25 pm

Web Title: you tuber comedian actress mallika dua takes dig at bollywood actor akshay kumar padman challenge movie