27 February 2021

News Flash

सूड-संवाद !

अ‍ॅक्शन सूडपटांच्या वळणाची ही गोष्ट दिग्दर्शिका लेन रामसी यांनी फार वेगळ्या पद्धतीने मांडली आहे.

‘यू वेअर नेव्हर रिअली हिअर सिनेमा

गेल्या शतकात जगभरातील साऱ्याच चित्रपटांनी नायकाच्या सूडक्षमतांबाबत प्रेक्षकांच्या डोक्यात भलतेच ठोकताळे ठोकून-ठोकून बसविले. सिंगल फसली असताना प्रचंड आरडा-ओरड करून फक्त पन्नासेक लोकांना हाणामारीत माती दाखविणाऱ्या ब्रुस ली किंवा जॅकी चान यांच्या मारकौशल्याबाबत मार्शल आर्टचे कारण तरी होते. अरनॉल्ड आणि सिल्व्हस्टर स्टॅलोन यांच्या खलनिग्रहणाय प्रवृत्तीत त्यांच्याअतिरिक्त व्यायामाने घडविलेल्या शरीरयष्टीचे कारण होते. आपल्याकडे ‘अँग्री यंग मॅन’ ते ‘परफेक्शनिस्ट’ ही बिरूदे मिरविणाऱ्या अभिनेत्यांच्या सिनेमातील हाणामारीचे सविनोद प्रकार पाहिले तर त्यांच्या शरीरात ‘युद्धकला’, ‘विजयकला’ या इनबिल्ट असल्याचे लक्षात येईल. शरीरक्षमतांचे आणि गुरूत्वाकर्षणाचे नियम सतत टाळणाऱ्या नायकांच्या सूडाग्रहाचे सिनेमे आपल्या प्रेक्षकांच्या बुद्धीची कक्षा अरूंद करण्यात महत्त्वाची ठरली. म्हणजे सत्तरोत्तरीच्या जगतातील सूडपटांतील खलवधाची पारंपरिक आखणी दोन-हजारोत्तर आजच्या काळातही तशीच राहिली. खलनायकासाठी नायकाने वापरलेल्या (कुत्ते-कमीने : प्राणीवाचक, ‘खून पिजाऊंगा’ : व्हॅम्पायरवाचक) शिव्या-संज्ञांमध्ये फक्त काहीप्रमाणात बदल झाला.  नायकाकडून ‘गोली मार भेजेमे’ प्रवृत्ती अंगिकारणाऱ्या वास्तववादी सिनेमांना आपल्याकडे कलात्मकतेचे लेबल लागते आणि फावल्या वेळात सूडासोबत रोमान्स, समाजकार्य,वाद्यनिपुणता आणि गानकौशल्य या गुणांची आराधना करणाऱ्या मल्टीटास्कर नायकांच्या व्यक्तिरेखांचे सिनेमे ब्लॉकबस्टर्स गटांत मोडतात.

हॉलीवूडला अभिनेता दैवतीकरणाचे कधीच वावडे नव्हते. उलट त्यांच्या अजस्र प्रसिद्धी यंत्रणांमुळेच अ‍ॅक्शन गटातील सिनेमांतील नायक जगन्मान्य झाले. सिनेमांतील हाणामारीमध्ये मात्र दर टप्प्यात विकास झालेला दिसतो. साठच्या दशकातील तगडे आणि बलाढय़ शरीरयष्टीबहाद्दर नायकांच्या हाणामाऱ्या एकांगी असत. ऐंशीच्या दशकातील गँगस्टरपटांमधून बंदूकआधारी नायकांची तयार झाली. नव्वदोत्तरी काळात बुद्धीवादी नायकांच्या चलाख आणि वास्तववादी हाणामाऱ्या दिसायला लागल्या. मार्शल आर्ट्सपासून वैविध्यपूर्ण युद्धकलांनी परिपूर्ण नायकांचे अ‍ॅक्शन सूडपट किमान बुद्धीशी फारकत घेणारे नसतात. त्यातही सूडपट कलात्मक असले, तर प्रेक्षकांच्या मेंदूचालनेला बराच वाव दिला जातो. हुआकिन फिनिक्स या अभिनेत्याने वठविलेला ‘यू वेअर नेव्हर रिअली हिअर’ हा गेल्या वर्षी फेस्टिवल वर्तुळांतून नावाजलेला आणि आता सार्वत्रिक झालेला चित्रपट मेंदूला चालना देणारा आणि नायकसूडाबाबत वर सांगितलेल्या कित्येक भोळसट संकल्पनांना टाळतो. या चित्रपटात जेमतेम भाषिक संवाद आहेत. मात्र इथल्या दृश्यांमधून प्रगट होणाऱ्या सूड-संवादाला तोडच नाही.

इथला जो (हुआकिन फिनिक्स) हा नायक निवृत्त झालेला युद्धसैनिक आहे. लहानपणापासून ते युद्धातील हिंसेच्या अनेक टप्प्यांनी त्याला छिन्नमनस्क अवस्थेत नेले आहे. तो कुटुंबवत्सल नसल्याने लादलेल्या एकांताशी लढत आपल्या वृद्ध आईसोबत तो राहतो. त्याचा व्यवसाय मात्र सरळ नाही. मध्यस्ताने आणलेल्या कामानुसार तो कुकर्म करणाऱ्या व्यक्तींना संपविण्याची सुपारी घेतो. त्यांना बंदुकीने नाही तर हतोडयाने निर्दयीपणे संपवतो. याचबरोबर मानवी व्यापारामध्ये अडकलेल्या मुलींना सोडवून आणण्याचीही कामे तो घेतो. चित्रपटाच्या सुरुवातीलाच जो याची मारमोहीम दाखविली आहे. यात प्रत्यक्ष हिंसेहून अधिक त्याच्या मनात दडलेल्या हिंसेच्या अनेक स्मृतींचे एकत्रिकरण करण्यात आले आहे. कामे आटोपून त्याचे घरात आईसोबतचे बोलणे आणि वावरणे यांचा तपशील रंगविला आहे. दुसऱ्याच दिवशी त्याच्याकडे नवे काम येते ते एका राजकारण्याची मुलगी उच्चभ्रूंसाठी असलेल्या कुंटणखान्यातून सोडविण्याचे. जो ते त्याने विकसित कौशल्याबरहुकूम करतो. मात्र त्यानंतर फासे उलटू लागतात. कुंटणखान्याशी संबंधित आणखी बडा राजकारणी भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून जो याचा ठावठिकाणा शोधून काढतो. जो याच्या मध्यस्तांसह त्याच्या आईचाही खून करतो. जो घरी पोहोचल्यानंतर त्याला मारण्यासाठी आलेल्या भ्रष्ट पोलिसांना निकाली लावतो. आपल्या आईच्या मृतदेहावर नदीत अंत्यसंस्कार करतो आणि आत्महत्या करण्याच्या एका टोकावरून राजकारण्यावरचा सूड तडीस नेण्यास सज्ज होतो.

पारंपरिक अ‍ॅक्शन सूडपटांच्या वळणाची ही गोष्ट दिग्दर्शिका लेन रामसी यांनी फार वेगळ्या पद्धतीने मांडली आहे. येथे जो याच्या भूमिकेतील हुआकिन फिनिक्सचा एकपात्रीसमान अभिनय आहे. गोष्टीचा तपशील आणि संवादाची मात्रा कमीतकमी ठेवून घडणाऱ्या गोष्टींबाबत कुतूहल वाढविण्याकडे इथे कल अधिक आहे. माणसे मारण्याची जो याची कला नेत्रदीपक नाही. त्याचे माणसांमध्ये वावरणेही सहज नाही. प्रेक्षकांच्या टाळीफेक मनोरंजनाचे रजनीकांती कसब त्याच्याकडे शून्य आहे. साधारणत: याच कथानकावर आधारलेल्या लिअम निसन अभिनेत्याच्या ‘टेकन’ मालिका किंवा जेसन स्टेथमच्ंया हार्डकोअर अ‍ॅक्शन सिनेमांना पाहिले असले, तर या चित्रपटातील सूडाचा बाज चटकन लक्षात येऊ शकेल.  ‘नायक म्हणूनी कोणी पराभूत करू शकत नाही’, या अतक्र्य संकल्पनांनी संपृक्त आपल्याकडच्या सूड सिनेमांच्या आवृत्त्यांना चटावलेल्यांना ‘यू वेअर नेव्हर रिअली हिअर’ सारख्या सिनेमांचा डोस खरा अत्यावश्यक आहे. त्यातला सूड-संवाद  ूकिमान चित्रपटांबाबतच्या बुद्धीविकासाचा आरंभ करू शकेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2018 3:24 am

Web Title: you were never really here hollywood movie review by pankaj bhosale
Next Stories
1 निक फ्यूरी ‘ब्लॅक पँथर’वर अद्याप नाखूशच
2  ‘अमेरिका भ्रष्टाचाराने पोखरलेला देश!’
3 राजेश खन्ना यांनी का बदलली होती त्यांच्या वरातीची वाट?
Just Now!
X