-सुनीता कुलकर्णी

सुशांत सिंग राजपुतच्या आत्महत्येने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. खरं तर बॉलिवूडचं जग किती तकलादू आहे, हे सगळ्यांना माहीत असतं. एका टॉपमुळे किंवा एका फ्लॉपमुळे इथे सगळी गणितं बदलतात. कोणताही वारसा नसताना इथे आपलं स्थान निर्माण करणं हे एव्हरेस्ट चढण्याइतकच अवघड. त्यात तुम्ही अभिनयाचे धडे आधी टीव्हीवर गिरवले असतील तर मोठा पडदा तुम्हाला कधीच आपलंसं करत नाही. या गोष्टीला अपवाद करून दाखवला तो दोन माणसांनी. एक शाहरुख खान आणि दुसरा सुशांत सिंग राजपूत. पण त्यातल्या शाहरुख खानने यशाची सगळी शिखरं पादाक्रांत केली आणि आपणच मांडलेला खेळ आपल्या हातांनी विस्कटून टाकून सुशांतने मात्र रडीचा डाव खेळला आहे.

देखणं रूप, मार्दवशील वागणं, चांगला अभिनय आणि नशिबाची साथ… मनोरंजनाच्या क्षेत्रांत यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी बिहारमधल्या पाटणा इथून आलेल्या सुशांतकडे होत्या. त्याला टीव्हीच्या छोट्या पडद्याने हात दिला आणि ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरोघरी पोहोचला. ही मालिका टीव्हीवर पाच वर्षे सुरू होती आणि त्यातील सुशांतच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती.

टीव्ही करणाऱ्यांना मोठ्या पडद्याचे वेध लागतात, तसे सुशांतला पण लागले. चेतन भगतच्या ‘थ्री मिस्टेकस ऑफ माय लाईफ’ कादंबरीवर आधारित ‘काय पो छे’ सिनेमात त्याला पहिला ब्रेक मिळाला. मग परिणीती चोप्रा बरोबरचा ‘शुद्ध देसी रोमान्स’, अमीर खान बरोबर ‘पिके’, ‘डिटेक्टिव्ह बोमकेश बक्षी’, ‘धोनी’, ‘राबता’, ‘केदारनाथ’, ‘छिचोरे’असे वेगवेगळे चांगल्या आणि मोठ्या बॅनरचे सिनेमे त्याला मिळत गेले. शंभर दोनशे कोटी बॉक्स ऑफिसवर खेचून आणतील असे त्याचे सिनेमे कधीच नव्हते. पण सगळ्याच प्रेक्षकांना असे सिनेमे कुठे हवे असतात? संवेदनशील प्रेक्षकांना आवडेल, पटकन आपला वाटेल असा कसदार अभिनेता तो नक्कीच होता.

जेमतेम ३४ वर्षांचं वय होतं त्याचं. बॉलिवूडच्या चमकधमक दाखवणाऱ्या पडद्यापलीकडच त्याचं जग कदाचित अंधारलेल असेल. तिथे कुठल्याही तरुणांच्या वाट्याला येतात तसे प्रेमभंग असतील, रॅट रेस मध्ये मागे पडण्याची, स्पर्धेत अपयशी होण्याची भीती असेल, करोनामुळे लादल्या गेलेल्या एकटेपणातून आलेलं औदासिन्य असेल… पण तरीही सुशांत तुझ्यासारख्या उमद्या तरुणाकडून अशी त्या मृत्यूच्या अंधाऱ्या खाईत सगळ्यांपासून तोंड लपवून कायमचं निघून जाण्याची अपेक्षा कधीच नव्हती. ‘शुद्ध देसी रोमान्स’ मध्ये स्वतःच्याच लग्नातून पळून गेलेला रघु राम आयुष्यातून पळून जात नाही, तर आयुष्याला भिडतो. ‘छिचोरे’मधला अनिरुद्ध आपल्या मुलासाठी सगळं जग उलथापालथ करतो. आणि झुंजार धोनीचं आयुष्य पडद्यावर जगणारा सुशांत असा अर्ध्या वाटेवर खचतो? आपलं आयुष्य एका गळफासाने संपवतो? तू चुकलास सुशांत, तू चुकलास…