बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय कलाकारांपैकी एक नाव म्हणजे अभिनेता आमिर खान. आमिरने नसीम हुसैन यांच्या ‘यादों की बारात’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याचा बॉलिवूड प्रवास सुरु झाला. वर्षाकाठी केवळ एकच ब्लॉकबस्टर चित्रपट करणारा आमिर चित्रपटाच्या निवडीबाबत बराच चोखंदळ आहे. त्यामुळेच त्याला मि. परफेक्शनिस्ट म्हटले जाते. मात्र यशाचे उच्च शिखर गाठणाऱ्या या अभिनेत्याने कधीकाळी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी स्वत: रिक्षा, बस, टॅक्सीमध्ये जाऊन पोस्टर चिटकवले होते.

भारतीय चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारवारीत नेणारा आमिर आज ‘जिनियस’, ‘परफेक्टशनिस्ट’, ‘मूव्हरिक’, ‘मि.ब्लॉकबस्टर’ म्हणून ओळखला जातो. मात्र बॉलिवूडमध्ये प्रवास करत असताना त्याला अनेक खाचखळग्यांचा समाना करावा लागला होता. १९८८ साली प्रदर्शित झालेल्या कयामत से कयामत तक या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमिरने स्वत: चित्रपटाचे पोस्टर बस आणि रिक्षामध्ये जाऊन चिटकवले होते. दरम्यान एका रिक्षावाल्याने रिक्षावर पोस्ट चिटकल्यामुळे आमिरला सुनावले होते. पण आमिरने परिस्थिती सांभाळून घेतली.

आणखी वाचा : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मराठी अभिनेत्याला लुटलं; लंपास केले ५० हजार

पाहा : ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान राहतो ‘या’ आलिशान घरात

‘कयामत से कयामत तक’ हा चित्रपट तयार करताना चित्रपटाच्या टीमला अनेक अडचणी आल्या होत्या. त्यातच हा चित्रपट लो बजेटचा होता. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमिर खान आणि चित्रपटाचे निर्माते स्वत: रस्त्यावर उतरले होते. विशेष म्हणजे पोस्टर चिटकवत असताना आमिर अनेक वेळा मी या चित्रपटाचा हिरो आहे असं नागरिकांना सांगत होता. त्यामुळे हा चित्रपट आमिरसाठी कायम लक्षात राहण्यासारखा आहे, असं म्हटलं जातं.

बॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध करणाऱ्या आमिरला प्रत्यक्षात एक लॉन टेनिस प्लेयर व्हायचे होते. लहानपणापासून आपल्याला टेनिस प्लेयर व्हायचं आहे हे स्वप्न त्याने उराशी बाळगलं होतं. मात्र त्यानंतर त्याच्या करिअरच्या वाटा वेगळ्या झाल्या.