कुछ तो गडबड है दया.. कुछ तो गडबड है’.. एक हात डाव्या खिशात आणि दुसरा उजवा हात चेहऱ्यासमोर गोल फिरवत एसीपी प्रद्युम्न गुन्ह्याची उकल करण्यासाठी पुढे सरसावतात आणि मग एकच वाक्य दोनदा बोलण्याच्या त्यांच्या खास शैलीत कधी दया तर कधी अभिजीतशी संवाद साधत एसीपी जेव्हा गुन्हेगारापर्यंत पोहोचतात तेव्हा गेली पंधरा वर्ष त्यांना याच थाटात पाहणारा त्यांचा प्रेक्षकही न चुकता त्यांच्या शेवटच्या संवादाची वाट पहात असतो. ‘अब तो तुम्हे फाँसी ही होगी..’ असा निर्णय एसीपी प्रद्युम्नने ऐकवला की मग खऱ्या अर्थाने प्रेक्षकांसाठी ‘सीआयडी’ची ‘फाइल’ त्या दिवसापुरती बंद होते. एसीपी प्रद्युम्न यांच्या शैलीची भुरळ भल्याभल्यांना पडते त्यामुळे एखादा लहानगा त्या ओढीने त्यांना खरोखरच भेटायला आला, तर त्यात नवल कुठले?
पडद्यावरच्या या ‘एसीपी’ साहेबांची भेट घेण्याच्या ओढीने एक बारा वर्षांचा मुलगा खरोखरच्या पोलिसांसमोरच उभा ठाकला तेव्हा ते पोलीसही चक्रावले. अंमली पदार्थविरोधी पथकाच्या कार्यालयात आलेल्या या मुलाला नेमके काय हवे आहे, याचा उलगडा खऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना होईना. मात्र, एसीपी प्रद्युम्न यांचे दोन हात म्हणजे ‘दया’ आणि ‘अभिजीत’ यांची नावे ऐकल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनाही ‘सीआयडी’शी संपर्क करावा लागला! एसीपी प्रद्युम्न आणि सीआयडीची भेट घेण्यासाठी इंदूरहून हा मुलगा घरातून पळून आला तो थेट अंमली पदार्थविरोधी पथकाच्या कार्यालयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास गोखले यांच्यासमोर उभा ठाकला. त्या मुलाची चौकशी केल्यानंतर तो सोनी वाहिनीवरच्या ‘सीआयडी’ मालिकेतील अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी घरातून पळून आला आल्याचे उघड झाले. गोखले यांनी या मुलाकडून त्याच्या वडिलांचा मोबाइल नंबर घेऊन प्रथम त्यांच्याशी संपर्क साधला.
त्या मुलाच्या वडिलांचा जीवही या दूरध्वनीमुळे भांडय़ात पडला. गेल्या दोन दिवसांपासून मुलाचा सगळीकडे शोध घेत असल्याची माहिती त्यांनी दिली. आपल्या मुलाला ‘सीआयडी’ मालिका खूप आवडते आणि त्यातील सगळे अधिकारी मुंबईत भेटतील असे कोणीतरी सांगितले असेल. तेव्हाच तो तिथे आला असल्याची शक्यता त्याच्या वडिलांना व्यक्त केली. गोखले यांनी मुलाची सगळी हकिगत जाणून घेतल्यानंतर आझाद मैदान पोलिसांशी संपर्क साधला आणि त्याला डोंगरीच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आले. कार्यालयीन काम पूर्ण झाले तरी त्या मुलाने व्यक्त केलेली निरागस इच्छा गोखलेंच्या मनातून जात नव्हती. त्यांनी ही सारी कथा फेसबुकवर टाकली आणि मामला सोनी वाहिनी आणि ‘सीआयडी’ टीमपर्यंत पोहोचला. एसीपी प्रद्युम्न म्हणजेच अभिनेता शिवाजी साटम आणि ‘सीआयडी’च्या कलाकारांनी त्याला भेटण्याची तयारी दाखवली असून येत्या एक-दोन दिवसांतच त्या मुलाची इच्छा पूर्ण होणार आहे.