बॉलीवुडमध्ये प्रवेश करणारी तरुण पिढी या क्षेत्रात अभिनयापासून नृत्यापर्यंत प्रत्येक गोष्ट शिकून घेऊन पूर्ण तयारीनिशीच उतरते. प्रत्येक गोष्टीची किमान माहिती तरी त्यांच्याकडे असते. आपल्या वेळेला मात्र या गोष्टी फार अवघड होत्या, असे मत अभिनेत्री माधुरी दीक्षितने व्यक्त के ले. ऑनलाइन नृत्याचे धडे देणाऱ्या माधुरी दीक्षितच्या हस्ते ‘टाटा स्काय’च्या ‘डान्स स्टुडिओ’ या नव्या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. त्या वेळी आपण काहीच माहिती नसल्याने काम करता करता कसे शिकत गेलो, याचा अनुभवही माधुरीने उपस्थितांना सांगितला.

‘‘मी वेगवेगळ्या नृत्य प्रकारांचे प्रशिक्षण घेतले होते. कथ्थकही शिकले होते. तरीही बॉलीवूडमध्ये येताना आम्हाला त्या वेळी काही कल्पना नव्हती. आत्ताची पिढी सगळी माहिती करून घेते आणि शिकून मगच पुढे जाते, ही खूप चांगली गोष्ट आहे,’’ असे माधुरीने नमूद केले. पारंपरिक नृत्य प्रकारात प्रशिक्षित असूनही ‘हमको आजकल है..’ या ‘सैलाब’ चित्रपटातील गाण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागली होती, असे तिने सांगितले. ‘डान्स स्टुडिओ’ ही ‘टाटा स्काय’ने आपल्या डीटीएचवर उपलब्ध क रून देण्यात आलेली नवी सेवा ‘डान्स विथ माधुरी’ आणि ‘आरएनएम मुव्हिंग पिक्चर्स’ या माधुरी आणि तिचे पती श्रीराम नेने यांच्या कंपन्यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आली आहे.
‘हमक ो आजकल है..’ या गाण्यावर नृत्य करताना सुरुवातीच्या काही ओळींमध्ये मला खाली जमिनीवर बसून काही नृत्य प्रकार करायचा होता. अत्यंत बॉलीवूड स्टाईल असा तो प्रकार मला मुळातच माहिती नव्हता. त्यामुळे त्याचा सराव करत असताना जमिनीवर खूप जोराने माझं डोकं आपटलं होतं, अशी आठवण तिने या वेळी सांगितली. हल्ली दीपिका पदुकोण, कतरिना कैफ, ऐश्वर्या राय बच्चन, आलिया भट, श्रद्धा कपूर या अभिनेत्री ज्या पद्धतीने आणि कुशलतेने नाचतात ते पाहून थक्क व्हायला होते, अशी कबुलीही माधुरीने या वेळी दिली. त्या वेळी चुकतमाकत काम करता करता आम्ही शिकत होतो, कारण तेव्हा असं शिकवणारे पोर्टल्स वगैरे नव्हते. आज ‘डान्स विथ माधुरी’ या आपल्या ऑनलाइन नृत्य प्रशिक्षण अकादमीसारखे पर्याय उपलब्ध झाले आहेत, याबद्दल तिने आनंद व्यक्त केला. आपल्या ऑनलाइन संस्थेत सातशे ते हजार लोक नृत्य शिकत आहेत; पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘डान्स स्टुडिओ’ सुरू करण्यात आल्याचे तिने सांगितले. या सेवेतही माधुरीकडून तिच्याच गाजलेल्या गाण्यांवर नृत्य शिकता येणार आहे. याशिवाय, शास्त्रीय नृत्य प्रकार, बॉलीवूड-पाश्चिमात्य नृत्यशैली, हिपहॉप हेही प्रकार या स्टुडिओच्या माध्यमातून लोकांना शिकता येतील, असे माधुरीने सांगितले. यातील काही गाण्यांवर सरोज खान, पंडित बिरजू महाराज, रेमो डिसोझा आणि टेरेन्स लेविससारखे मान्यवर नृत्य प्रशिक्षकही नृत्याचे धडे देणार आहेत. ‘डान्स स्टुडिओ’मध्ये नृत्यातील गुरू आणि महागुरू दोन्ही उपलब्ध आहेत, असे मिश्कीलपणे सांगणाऱ्या माधुरीने लवकरच आंतरराष्ट्रीय नृत्य दिग्दर्शकही या स्टुडिओच्या माध्यमातून नृत्य शिकवू शकतील, असे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.