परदेशातील गायनाचा कार्यक्रम आटोपून गुरूवारी नाशिक येथे परतत असतांना दुपारी मुंबई-आग्रा महामार्गावर शहापूरजवळ  झालेल्या अपघातांत शहरातील युवा गायिका गीता माळी (३७) यांचा मृत्यू झाला.

गीता या गायनाच्या विविध कार्यक्रमांसाठी अमेरिका येथे गेल्या होत्या. दौरा आटोपल्यानंतर गुरूवारी त्या भारतात परतल्या. मुंबई विमानतळावरून नाशिककडे परत येत असतांना शहापूरजवळ  त्यांची गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या इंधनाने भरलेल्या गाडीवर आदळली. या अपघातात गीता यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे पती अ‍ॅड. विजय माळी यांना गंभीर दुखापत झाली आहे. गीता यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, सासु-सासरे, पती विजय, मुलगा मोहित असा परिवार आहे.

गीता माळी यांनी सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या सुरेल आवाजाने वेगळी ओळख निर्माण केली होती. गीता यांचे शालेय शिक्षण मराठा हायस्कूलमध्ये झाले. एस.एम.आर.के. महिला महाविद्यालयाचे अविराज तायडे, पंडित शंकर वैरागकर, मुंबई विद्यापीठाचे अच्युत ठाकूर यांच्याकडे त्यांनी गायनाचे शिक्षण घेतले. सुगम संगीतामध्ये त्यांनी स्वत:ची वेगळी शैली निर्माण केली. याशिवाय अध्यात्म-ध्यान धारणा याचीही त्यांना आवड होती.  देश-विदेशात त्यांच्या गायनाचे अनेक कार्यक्रम झालेले आहेत. अनेक दिग्गजांसोबत त्यांनी गायन केले आहे. त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे शहरातील सांस्कृतिक क्षेत्राला धक्का बसला आहे.