22 February 2019

News Flash

VIDEO : बहुप्रतिक्षित ‘यंग्राड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

चित्रपट ६ जुलै २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये होणार प्रदर्शित

Youngraad, यंग्राड

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने हे नेहमीच वैविध्यपूर्ण कथा असणाऱ्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. ‘यंग्राड’ हा त्यांचा आणखी एक तसाच हटके चित्रपट. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. एका दिमाखदार सोहळ्यात अभिनेता शरद केळकर, सविता प्रभुणे, शशांक शेंडे, चैतन्य देवरे, सौरभ पडवी, शिव वाघ, जीवन कराळकर आणि शिरीन पाटील यांच्या उपस्थितीत चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला.

चैतन्य देवरे, सौरभ पडवी, शिव वाघ आणि जीवन कराळकर या चार युवकांच्या मध्यवर्ती भूमिका या चित्रपटात आहेत. त्याशिवाय चित्रपटात शरद केळकर, सविता प्रभुणे शिरीन पाटील, मोनिका चौधरी, शशांक शेंडे, विठ्ठल पाटील आणि शंतनू गणगणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटाचे लेखन मकरंद माने यांनी केले असून त्यांनी या चित्रपटाची पटकथा शशांक शेंडे आणि अझीझ मदारी यांच्यासह लिहिली आहे. युवा संगीत दिग्दर्शक हृदय गट्टानी आणि गंगाधर यांनी संगीत दिले आहे. चित्रपटातील गाणी क्षितीज पटवर्धन, दत्ता पाटील आणि माघलुब पूनावाला यांनी लिहिली आहेत. यातील चार गाणी शंकर महादेवन, दिव्य कुमार, शाश तिरुपती आणि हृदय गट्टानी यांनी गायली आहेत.

‘यंग्राड’ हा बोलीभाषेतील प्रचलित शब्द असून तो भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये उनाड मुलांसाठी वापरला जातो. एखाद्याबरोबर भांडण उकरून काढणे किंवा मित्राला त्याच्या स्वप्नपरीबरोबर सुत जुळवायला मदत करणे यासाठी हे चारही मित्र नेहमीच एकमेकांच्या मदतीला धावून येत असतात. पण या संस्कारक्षम वयात चुकीचे आदर्श समोर असल्याने हे चार युवक नेहमीच अडचणीत सापडतात. त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर होतो आणि आपल्याला आयुष्याची सर्व माहिती आहे, अशा आविर्भावात वावरणारे हे चौघे एका क्षणी अशा निष्कर्षाला येतात की त्यांचे आयुष्यच विस्मरणात गेल्यासारखे होते. त्यानंतर मग ते स्वत्वःचा शोध घेऊ लागतात आणि आयुष्याच्या नवीन प्रवासाला लागतात.

वाचा : Alia Bhatt-Ranbir Kapoor: आलिया- रणबीरच्या रिलेशनशिपविषयी काय म्हणाली पूजा भट्ट?

‘यंग्राड’च्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवताना मला विशेष आनंद होत आहे. मराठी सिनेमामध्ये प्रेरणादायी अशी गोष्ट आणि दमदार कथा असतात. त्यांच्या जोडीला कसदार अभिनेत्यांची फळी असते. आमहाला हे सर्व आमच्या प्रेक्षकांसमोर आणताना विशेष आनंद होत आहे,” असे मधु मंटेना यांनी म्हटले आहे.

दमदारपणा, उत्साह आणि अविस्मरणीय व्यक्तिरेखा या वैशिष्ट्यांनी हा चित्रपट नटला असून तो प्रेक्षकांना खिळवून ठेवेल एवढे निश्चित. ही भव्य अशी कथा ६ जुलै २०१८ रोजी पडद्यावर साकारात आहे.

First Published on June 19, 2018 3:26 pm

Web Title: youngraad marathi movie official trailer video shashank shende sharad kelkar makarand mane