अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापासून बॉलिवूड अनेक कलाकारांना ट्रोल केलं जात असून, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी औरंगाबादमधून एका २७ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. मुंबई सायबर पोलिसांनी सोनाक्षी सिन्हानं तक्रार दिल्यानंतर ही कारवाई केली.

मागील काही दिवसांपासून बॉलिवूडमधील घराणेशाहीवरून काही कलाकारांना ट्रोल केलं जात आहे. यात सोनाक्षी सिन्हाचाही समावेश होता. त्यामुळे सोनाक्षीनं इन्स्टाग्रामवरील कमेंट सेक्शनही बंद करून टाकलं होतं. काही दिवसांपूर्वी तिने हे सेक्शन पुन्हा सुरू केलं. हे करताना आक्षेपार्ह शब्द वापरू नये, असं आवाहनही केलं होतं.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने महिला सुरक्षेबाबत ‘अब बस प्रॉम्प्ट अॅक्शन अगेन्स्ट हॅरॅसर्स’ या हॅशटॅगनं एक चित्रफित शेअर केली होती. विशेष मोहीम तिनं राबवली. मात्र, या चित्रफितीवरून औरंगाबाद येथील शशिकांत जाधव या तरुणानं वादग्रस्त टिप्पणी केली. या तरुणानं टिप्पणी करताना इतर कलाकारांबाबतही आक्षेपार्ह भाषा वापरली.

या प्रकरणी सोनाक्षी सिन्हाने ८ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेनं याची गंभीर दखल घेत प्रकरणी कारवाई केली. तरुणाविरुद्ध विनयभंग व माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधात्मक कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

चौकशीमध्ये टिप्पणी करणारा तरुण औरंगाबाद येथील असल्याचं समोर आलं. त्यानंतर सायबर गुन्हे शाखा पोलिसांनी शशिकांत जाधव याला अटक केली. तो औरंगाबाद शहरातील तुळजी नगरमध्ये राहतो. पोलिसांनी तरुणाला न्यायालयासमोर हजर केलं असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.