लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता संजय दत्त याच्यावर चित्रपट बनत असल्याचे सर्वांनाच माहित आहे. यावर्षाच्या शेवटी डिसेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात संजूबाबाची भूमिका साकारणारा अभिनेता रणबीर कपूरच्या मते सदर चित्रपटातून खूप काही शिकण्यासारखे असल्याचे त्याने म्हटले आहे.

रणबीर कपूरने नुकतीच फिल्मफेअरसाठी एक मुलाखत दिली. त्याने यावेळी चित्रपटाविषयी देखील चर्चा केली. संजय दत्तच्या आयुष्यातील काही पैलूंना चित्रपटात खूप सुंदर पद्धतीने दाखविण्यात आल्याचे रणबीरने सांगितले. तो म्हणाला की, चित्रपटात संजय दत्त आणि त्याचे वडिल सुनील दत्त यांच्यातील नात्याला भावनिक दृष्ट्या खूप छान पद्धतीने चित्रीत करण्यात आले आहे. संजय दत्तच्या आयुष्यात घडलेल्या काही घटना यात दाखविण्यात आल्या असून चित्रपटातून तरुणांना खूप काही शिकण्यसारखे असल्याचे रणबीरला वाटते.

संजूबाबाच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी करत आहे. हिरानीच्या खात्यात ‘३ इडियट्स’, ‘मुन्ना भाई एमबीबीएस’, ‘लगे रहो मुन्ना भाई’, ‘पीके’ यांसारखे हिट चित्रपट आहेत. राजकुमार हिरानीने त्याच्या बॉलीवूडमधील कारकिर्दीची सुरुवात ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ चित्रपटाने केली होती. यात संजय दत्तने मुख्य भूमिका साकारली होती.

सध्या बॉलिवूडमध्ये चरित्रपट बनवण्यालाच अधिक प्राधान्य दिले जात आहे. जेव्हा संजय दत्तच्या आयुष्यावर चरित्रपट बनणार ही बातमी कळली, तेव्हा त्याच्या चाहत्यांना कमालीचा आनंद झाला. संजय दत्तचे आयुष्य अनेक उतार- चढावांनी भरलेले आहे. या चरित्रपटाबद्दल संजय दत्तची बहिण प्रिया दत्त यांनी आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, या चित्रपटात माझा सहभाग एवढा महत्त्वपूर्ण नाही. या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना बरोबर माहीत आहे आणि मला विश्वास आहे की जे ते करतील ते चांगलेच असेल. प्रिया यांच्या या वक्तव्यावरुन हे स्पष्ट झाले आहे की त्यांचा राजू हिरानी यांच्या दिग्दर्शनावर पूर्ण विश्वास आहे.