काही दिवसांपूर्वी अभिनेता अक्षय कुमारने एका यूट्यूबरवर ५०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकला. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी राशिद सिद्दीकीने एक फेक व्हिडीओ केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने अक्षय कुमारच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यामुळे या प्रकरणी अक्षयने राशिदवर ५०० कोटींचा दावा ठोकला आहे. मात्र, राशिदने आता या प्रकरणी त्याची प्रतिक्रिया दिली असून अक्षयने ही नोटीस मागे घ्यावी अशी विनंती त्याने केली आहे.

रशिदने अक्षय कुमारला नोटीस मागे घेण्याची विनंती केली आहे. तसंच ही नोटीस मागे न घेतल्यास तो कायद्याची मदत घेणार असल्याचंदेखील त्याने सांगितलं आहे. राशिदच्या वकिलांनी जे.पी.जयस्वाल यांनी अक्षयच्या नोटीसला उत्तर पाठवत राशिदवर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे.

“कुमारने केलेले आरोप हे अत्यंत निंदनीय आणि खोटे आहेत. हे सगळे आरोप राशिदला त्रास देण्यासाठी करण्यात आले आहेत. सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अनेक पत्रकारांनी या विषयी भाष्य केलं होतं. यात अनेक नावाजलेले पत्रकार व माध्यमे आहेत”, असं राशिदने पाठवलेल्या उत्तरात नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, गेल्या चार महिन्यांत युट्यूबवर राशिदने सुशांतचे फेक व्हिडीओ अपलोड करून तब्बल १५ लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला सुशांतच्या मृत्यूशी निगडीत अपलोड केलेल्या व्हिडीओ अधिकाधिक व्ह्यूज मिळत गेल्याने त्याने सप्टेंबर महिन्यात साडेसहा लाखांची कमाई केली होती.