गेल्या वर्षभरापासून करोनाचे संक्रमन वाढत चालले आहे. दिवसेंदिवस मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असून, मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. यामुळे चित्रपटाचे चित्रीकरण देखील बंद करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर संपूर्ण हिंदी चित्रपसृष्टीत रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना आदित्य चोप्रा यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

आदित्य चोप्रा यांच्या yrfच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करोनाच्या ६०,००० लशींच्या खरेदीची परवानगी देण्याची विनंती करण्यात आली. या कामगारांचे लसीकरण करण्यासाठी लागणारा सर्व खर्च उचलण्याची तयारी व्हायआरएफने सादर केलेल्या विनंती पत्रात दर्शविण्यात आली आहे.

व्हायआरएफच्या वतीने फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) ला पाठविण्यात आलेल्या पत्रात नमूद केले आहे की, “सध्या सिनेउद्योग मोठ्या अनिश्चिततेमधून जातं असून लवकरात लवकर काम सुरू करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून रोजंदारीवर जगणाऱ्या हजारो कामगारांना कामावर रुजू होऊन स्वत:च्या कुटुंबाचे रक्षण करणे शक्य होईल. यश राज फिल्म्सने यश चोप्रा फाउंडेशनमार्फत या दिशेने मदतीचा हात पुढे केला आहे. सुमारे ३० हजार नोंदणीकृत कामगारांकरिता करोनाची लस विकत घेण्याची परवानगी आम्हाला द्यावी या आशयाचे पत्र आम्ही महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. चित्रपटसृष्टीशी संबंधित मुंबईतील फेडरेशनच्या या सदस्यांना लवकरात लवकर लस मिळाली पाहिजे.”

या पत्रात पुढे लिहिण्यात आले आहे की, “यश चोप्रा फाउंडेशन’च्या वतीने कामगारांकरिता लागणाऱ्या लसीकरणाचा सर्व खर्च उचलण्यात येणार आहे. या खर्चात जनजागृती करणे, कामगारांची ने-आण तसेच लसीकरण कार्यक्रमाकरिता पायाभूत सुविधा उभारण्यात येईल. आम्हाला आशा आहे की, आमची नम्र विनंती स्वीकारली जाईल. त्यामुळे आमचे सदस्य सुरक्षित राहतील आणि त्यांना कामावर लवकरात लवकर रुजू होता येईल.”