विचारी, सर्जनशील व संवेदनशील व्यक्तींना आयुष्यात कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर आपल्या अस्तित्वासंबंधीचे आणि एकूणच आपल्या जगण्यासंदर्भात, त्याच्या प्रयोजनाबद्दल प्रश्न पडत असतातच. विश्वाच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत संत-महंत, महापुरुष, ऋषीमुनी, तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, विचारवंत आणि सर्जनशील माणसांना याच प्रश्नांनी भंडावून सोडलं आहे. ‘मी कोण? माझ्या जगण्याचं प्रयोजन काय? विश्वाच्या जगड्व्याळ पसाऱ्यात माझं स्थान काय? अथांग  ब्रह्मांडात ‘मी’ किती क्षुल्लक, नगण्य जीव आहे..’ या आणि अशा प्रश्नांचा भुंगा त्यांना कुरतडत राहतो. आणि त्यांची उत्तरं ही मंडळी आपापल्या परीनं शोधत असतात. मानवी अस्तित्वाबद्दलच्या या गूढ, अनाकलनीय प्रश्नांबद्दलचं त्यांचं चिंतन, मनन, संशोधन आणि अभ्यास यांतून त्यांना जे ज्ञान प्राप्त होतं ते, ते आम लोकांसमोर ठेवतात. यातूनच अनेक ज्ञानशाखांचा जन्म झाला आणि त्या विकास पावल्या. असं जरी असलं, तरी या विश्वाचं कोडं अद्यापि माणसाला पूर्णत: उकललेलं नाही, हे वास्तव आहे. मानवी ज्ञानाच्या कक्षेपलीकडे अजूनही अशा असंख्य गोष्टी अस्तित्वात आहेत, ज्या हुडकून काढण्याचे माणसाचे प्रयत्न अविरतपणे सुरू आहेत. जो-तो आपापल्या परीनं हे गूढ उकलू पाहतो आहे. मानवजातीस पडणाऱ्या अशा प्रश्नांची प्रत्येकाची उत्तरं मात्र वेगवेगळी असतात. अर्थात व्यक्तीपरत्वे तशी ती असणारच.

नाटककार महेश एलकुंचवार यांच्या ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ आणि ‘युगान्त’ या नाटय़त्रयीचा प्रवास शेवटच्या टप्प्यात याच विश्वव्यापी प्रश्नांपाशी येऊन पोहोचतो. विदर्भातील धरणगावकर देशपांडे कुटुंबातील तीन पिढय़ांचं चित्रण असलेल्या ‘वाडा’त्रयीत तिसऱ्या पिढीला आपल्या अस्तित्वाबद्दल आणि त्याच्या प्रयोजनाबद्दल हे प्रश्न पडलेले आहेत. त्यांच्या भोवतालची.. त्यांच्या व्यक्तिगत जीवनातली परिस्थिती त्यास पोषक आहे. अतीव सुख आणि अतीव दु:ख वाटय़ाला आल्याने कदाचित हे प्रश्न त्यांना तीव्रतेनं जाणवत असावेत. पैकी धरणगावातच अडकून पडलेला पराग नैतिकता झुगारून देत आर्थिक कोंडीत सापडलेल्या आपल्या कुटुंबास गर्तेतून वर काढण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी वाममार्ग पत्करतो. त्याबद्दलची शिक्षाही तुरुंगवासाने भोगतो. तुरुंगातील वास्तव्याने त्याची पाटी कोरी होते. त्याला आपला जीवनहेतू सापडतो. ज्या गावानं त्याला ‘ओवाळून टाकलेला’ म्हणून हिणवलं, त्या गावावर सलग आठ वर्षे अवर्षणाचं संकट आल्यावर तो गावाबद्दलच्या, तिथल्या माणसांच्या कळवळ्यातून गाव सोडून जायला नकार देतो. ओसाड वाळवंट झालेल्या गावात तो जिद्दीनं रुतून बसतो. आपलं गावाप्रती.. इथल्या माणसांप्रती काही कर्तव्य आहे.. नव्हे, आपण त्यांचं देणं लागतो, ही भावना त्याला तिथून हलूच देत नाही. म्हणूनच धूळधाण झालेल्या वाडय़ातही नंदिनी आणि बाळसह तो पाय रोवून उभा राहतो. आपलं जे काही व्हायचं असेल ते इथंच होईल, पण आपण शेवटपर्यंत लढायचं असं तो ठरवतो. दरम्यान, गावातली माणसं एकेक करून चारी दिशांना पांगलीयत. कुणीच आता या उजाड गावात फिरकत नाही.

Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क

..आणि एके दिवशी अभय (परागचा चुलतभाऊ) अचानकपणे येतो. थेट युरोपातील स्वीडनमधून. शास्त्रज्ञ असलेला अभय आपल्या मुळांच्या शोधात खूप वर्षांनी धरणगावात परतला आहे. म्हटलं तर त्याला कसलंच दु:ख नाहीए. भौतिक सुखं हात जोडून त्याच्यासमोर उभी आहेत. पण तरीही तो सुखी नाहीए. त्याला आपल्या जगण्याचं प्रयोजन काय, हा प्रश्न पडलाय. आपल्यानंतर आपलं काहीच मागे उरणार नाहीए, हा सल त्याला छळतो आहे. सिंथियाबरोबरच्या त्याच्या सहजीवनात अंतराय निर्माण झालाय. परस्परांवर कितीही गाढ प्रेम असलं तरी आता त्यांच्यात एक अदृश्य दरी निर्माण झालीय. जी दिवसेंदिवस वाढत चाललीय. ज्या तळ्याच्या ओढीनं तो धरणगावात परतलाय ते तळंही आता उरलेलं नाही. म्हणजे सगळंच अशाश्वत आहे तर! मग माणसं कुठल्या आशेवर जगतात? पराग-नंदिनी कुठल्या आशादायी भविष्यावर जगताहेत? स्मशान झालेल्या या गावात त्यांना, त्यांच्या बाळला काय भवितव्य आहे? हेही प्रश्न त्याला पडलेत.

..तर परागला आपण आपल्या मुलाला या उद्ध्वस्त झालेल्या गावात कोणता वारसा देणार आहोत, या विकल जाणिवेनं हतबल व्हायला होतं. मात्र त्यानं धीर सोडलेला नाही. शेवटपर्यंत लढण्याचं बळ त्याच्यात आहे. त्याच्या आणि नंदिनीच्या घट्ट नात्यानं त्याला ते दिलंय. गावकऱ्यांप्रतीच्या कर्तव्यभावनेतून ते आलंय. तुरुंगातून आमूलाग्र बदलून आलेला पराग सुख-दु:खांना सहजगत्या सामोरं जायला शिकलाय. तरी त्याला प्रश्न पडतो : चंदूकाकाच्या आयुष्याचं प्रयोजन काय? ‘स्व’च्या शोधात घराबाहेर पडलेला चंदूकाका त्याला गंगेच्या किनारी भिकाऱ्यांच्या रांगेत सापडतो. जबरदस्तीनं पराग त्याला घरी घेऊन येतो. पण मैनेकडे गेलेल्या चंदूकाकाचा गावकऱ्यांच्या संतापात बळी जातो. चंदूकाकाच्या जगण्या-मरण्याचा नेमका अर्थ काय लावायचा?

नाटककार महेश एलकुंचवारांनी ‘युगान्त’ हे माणसाच्या अस्तित्वासंबंधात प्रश्न उपस्थित करणारं ‘वाडा’त्रयीतलं तिसरं नाटक हेतुत: रचलं आहे. तत्त्वचिंतनाच्या पातळीवर जाणाऱ्या या नाटकात घटना अशा नाहीतच. आहे ती फक्त चर्चा. पराग, नंदिनी आणि अभयमध्ये घडणारी. भोवतालचं भयाण वास्तव हा आणखीन एक घटक. चर्चेला भौतिक परिमाण पुरवणारा. ‘युगान्त’मध्ये मानवी संबंधांतील खोल जाणिवा अत्यंत तरलपणे व्यक्त झालेल्या आहेत. एका प्रगाढ शांततेत अनुभवण्याचं हे नाटक आहे.

दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी नाटकातला काळ व अवकाश, त्यांत वावरणारी माणसं, त्यांचा ‘स्व’शी चाललेला मानसिक-भावनिक संघर्ष आणि त्यातून त्यांना पडणारे आपल्या अस्तित्वाबद्दलचे प्रश्न तितक्याच हळुवारपणे, तरलतेनं मांडले गेले आहेत. उद्ध्वस्त वाडय़ाच्या पडलेल्या भिंतींतून घोंघावणारा वारा, दूरवरचं कुत्र्यांचं विव्हळणं, कंदिलाच्या गहन-गूढ प्रकाशात नि:शब्द वावरणारी माणसं, गावात माणूस गेल्यावर होणारा घरच्यांचा आकांत.. यांची पाश्र्वकिनार ‘युगान्त’मधील आशय अधिक सखोल करते. पात्रांच्या मोजक्या हालचाली, तसंच बोलणं, भयकंपित शांतता, विरामाच्या बोलक्या जागा यांतून नाटकात बरंच काही घडत राहतं. ते ऐकण्यासाठी आस्वादकानं जिवाचा कान करणं अपेक्षित. तरच नाटक त्याच्यापर्यंत आता पोहोचणार. पराग-नंदिनीच्या अव्यक्त सहजीवनातही किती गहिरा अर्थ भरला आहे याची अभयला प्रकर्षांनं जाणीव होते. त्या पाश्र्वभूमीवर त्याचं आणि सिंथियाचं साकळलेलं.. काहीही व्यक्त न करणारं सहजीवन त्याला अधिकच व्यथित करतं. ‘युगान्त’ पाहताना एक प्रश्न मात्र राहून राहून पडतो, की स्वत: शास्त्रज्ञ असलेल्या अभयला मानवी जीवनाकडे विज्ञाननिष्ठ दृष्टीनं का पाहता येत नसेल? केवळ वंशसातत्यातूनच मानवी जीवनाची परिपूर्ती होते का? की आपल्या अस्तित्वाबद्दलच्या प्रश्नांनी त्याच्यातला शास्त्रज्ञ हरवला आहे? चंदूकाकाचं अर्थहीन पूर्वायुष्य पाहता त्याचं दिशाहीन होणं एक वेळ समजून घेता येतं. तसंच प्रश्नांना आपणच उत्तरं होण्याचं नंदिनीचं तत्त्वज्ञानही! या सगळ्यांत अभयच तेवढा का भेलकांडून जातो? सांगता येत नाही. काही काही प्रश्नांची उत्तरं कधीच मिळत नाहीत. असे सारे प्रश्न दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी प्रयोगातून आस्वादकांच्या मनी निर्माण करण्यात यश मिळवलं आहे. आणि यातच ‘युगान्त’चं यश आहे.

प्रदीप मुळ्ये यांनी पडलेल्या/ तडे गेलेल्या भिंती आणि खांब, नसलेला दरवाजा, घरातलं सारं काही सावकाराहाती गेल्याच्या खुणा दर्शवणाऱ्या ओक्याबोक्या जागा यांतून उद्ध्वस्त वाडा सर्वार्थानं उभा केला आहे. आनंद मोडक- राहुल रानडे यांनी पाश्र्वसंगीतातून गावाच्या भयकारी ध्वस्ततेचं परिमाण गडद केलं आहे. रवि-रसिक यांनी प्रकाशयोजनेतून विविध प्रहरांचे यथार्थ संदर्भ पुरवून नाटकातील गहन-गूढता अधोरेखित केलेली आहे. प्रतिमा जोशी-भाग्यश्री जाधव यांनी वेशभूषेतून, तसंच शरद सावंतांनी रंगभूषेतून पात्रांना वास्तवदर्शीत्व बहाल केलं आहे.

‘मग्न तळ्याकाठी’मध्ये रगेल, कुणालाही मस्तवालपणे शिंगावर घेणारा अध:पतित (पण मनाचा निर्मळ) पराग रंगवणाऱ्या चिन्मय मांडलेकर यांनी ‘युगान्त’मध्ये मात्र महापूर ओसरल्यावर शांतपणे वाहणारा नदीचा प्रवाह अभिव्यक्त केला आहे. तुरुंगवासापश्चात ‘संतत्वा’कडे झालेला त्याचा प्रवास त्यातून दिसून येतो. आयुष्यात अनेक टक्केटोणपे खाऊन आलेलं निरामय शहाणपण त्यांच्या बोलण्या-वागण्यातून, देहबोलीतून व्यक्त होतं. अर्थात नंदिनीचं (पूर्वा पवार) समईतल्या ज्योतीसारखं परागच्या आयुष्यात प्रकाशत राहणं त्यासाठी आश्वासक ठरलं आहे. तिचा विलक्षण समजूतदारपणा, तिची मूक, पण ठाम साथ यास कारणीभूत ठरलीय. आपण नेमके कशासाठी आणि का जगतो आहोत, आपल्या अस्तित्वाचं प्रयोजन काय, या प्रश्नांनी अभयचं (सिद्धार्थ चांदेकर) सैरभैर होणं त्यामुळेच उठून येतं. सर्वसामान्य माणूस आपलं अस्तित्व वंशसातत्यातून टिकलं पाहिजे, या गंडानं पछाडलेला असतो. अभयही त्यास अपवाद नाही. विज्ञाननिष्ठेची ज्याच्याकडून अपेक्षा.. असा शास्त्रज्ञ असूनदेखील! चंदूकाकाची फरफट आणि जगण्याचा आकांत राम दौंड यांनी अवघ्या देहबोलीतून व्यक्त केला आहे.

एक विषण्ण आणि उदास करणारा नाटय़ानुभव ‘युगान्त’ देतं.. खचितच!