मराठी चित्रपटांची संख्या वाढली असली विविध विषय हाताळले जात असले तरी गल्लापेटीवर यश मिळविणाऱ्या चित्रपटांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. आधी ‘काकस्पर्श’ आणि नंतर ‘बालक पालक’ या रवी जाधव दिग्दर्शित चित्रपटांच्या तुफान यशानंतर ‘झपाटलेला २’ या महेश कोठारे दिग्दर्शित चित्रपटाने पहिल्या आठवडाअखेपर्यंत तब्बल साडेतीन कोटी रुपयांचा विक्रमी गल्ला गोळा केला,अशी माहिती ‘वायकॉम१८’चे जयेश मुझुमदार यांनी दिली. आतापर्यंत हिंदी चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या या कंपनीने ‘झपाटलेला २’द्वारे मराठीत पदार्पण केले आहे.
विशेष म्हणजे प्रदर्शनाच्या पहिल्याच तीन-चार दिवसांत या चित्रपटाने दीड कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला होता. मुंबईसह राज्यातील जवळपास सर्व ठिकाणी थ्रीडी सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. पहिल्या आठवडय़ात मिळालेल्या चित्रपटगृहांच्या संख्येत दुसऱ्या आठवडय़ात वाढ करण्यात आली. दुसऱ्या आठवडय़ात जवळपास ५००-६०० स्क्रीन्समध्ये ‘झपाटलेला २’ झळकला, असेही ते म्हणाले. चित्रपटाच्या गल्लापेटीचा विचार केला तर त्यातील ४० टक्के वाटा मुंबई-ठाणे-वाशी-पुणे या शहरांचा आहे, असेही त्यांनी सांगितले.
‘वाय कॉम १८’ने आता सलग दोन मराठी चित्रपटांची निर्मिती केली असून लेखक अशोक व्हटकर यांच्या कादंबरीवर आधारित आणि राजीव पाटील दिग्दर्शित ‘७२ मैल’ हा त्यांचा दुसरा मराठी चित्रपट २६ जुलै रोजी तर ‘कुमारी गंगूबाई नॉनमॅट्रिक’ या नाटकावर बेतलेला त्याच नावाचा तिसरा चित्रपट २३ ऑगस्ट रोजी प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे मुझूमदार यांनी सांगितले.