बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री जरीना वहाब आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. ८० च्या दशकात प्रेक्षकांच्या हृदयावर राज केलेल्या अभिनेत्री जरीना वहाब आजही लाखो प्रेक्षकांना अभिनयाची भूरळ पाडतात. रूपेरी पडद्यावर कधी आई तर सासू बनून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्या अभिनेता आदित्य पांचोली यांची पत्नी आणि अभिनेता सूरज पांचोलीची आई आहेत.

अभिनेत्री जरीना वहाब यांचा जन्म १७ जुलै १९५९ मध्ये आंध्र प्रदेशमधल्या विशाखापट्टणममध्ये झाला. त्यांनी हिंदी आणि इंग्रजी तसंच उर्दू आणि तेलुगु सारख्या कित्येक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलंय. अभिनेत्री जरीना वहाब यांनी पुण्यातल्या फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया मधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना फिल्म इंडस्ट्रीत बराच संघर्ष करावा लागला होता. अभिनेत्री जरीना वहाब ज्यावेळी बॉलिवूडमध्ये संघर्ष करत होत्या, त्यावेळी त्यांच्या सावळ्या रंगामुळे अनेकदा मागे पडू लागल्या. त्यांना केवळ त्यांच्या सावळ्या रंगामुळे चित्रपटांमध्ये घेतलं जात नसत.

अभिनेत्री जरीना वहाब यांचा सगळ्यात पहिला चित्रपट ‘इश्क इश्क इश्क’ हा होता. अभिनेते देव आनंद त्यांच्या चित्रपटासाठी एका नव्या चेहऱ्याच्या शोधात आहेत, हे जेव्हा जरीना वबाह यांना कळलं, त्यावेळी त्यांनी ताबडतोब चित्रपटासाठी ऑडिशन दिलं. या चित्रपटात जरीना वहाब यांना अभिनेत्री जीनत अमान यांच्या बहिणीचा रोल मिळाला होता. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हवा तितका चालला नाही. पण अभिनेत्री जरीना वहाब मात्र या चित्रपटामुळे बऱ्याच चर्चेत आल्या होत्या. त्यांच्यासमोर दिवसेंदिवस नव नव्या चित्रपटासाठी रांगा लागू लागल्या. त्यानंतर त्यांनी ‘घरौंदा’, ‘अनपढ़’, ‘सावन को आने दो’, ‘नैया’, ‘सितारा’ आणि ‘तड़प’ सारख्या चित्रपटात काम केलं.