प्रसिद्ध अमेरिकन सुपरमॉडल गिगी हदीद आणि लोकप्रिय गायक झेन मलिक नुकतेच आई-बाबा झाले आहेत. गिगीने एका गोड चिमुकलीला जन्म दिला आहे. या दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. जेनने ही आनंदाची बातमी शेअर करण्यासोबतच बाळाचा एक फोटोदेखील शेअर केला आहे.

“ही आमची चिमुकली. सुदृढ आणि सुंदर. आता सध्या माझ्या मनात नेमके कोणते भाव आहेत हे सांगणं फार कठीण आहे. या चिमुकलीला पाहिल्यानंतर मला तिच्याविषयी जे प्रेम, काळजी वाटते ते शब्दांत मांडता येणार नाही. तिला समजून घेण्यासाठी उत्सुक आहे. ही माझी चिमुकली आहे आणि मला त्याचा गर्व आहे”, असं झेनने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, झेन आणि गिगी हे हॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. हे दोघंही सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून अनेकदा ते एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. विशेष म्हणजे गिगीने काही दिवसांपूर्वी बेबीबंपसोबत फोटोशूट केलं होतं. तिचे हे फोटो त्यावेळी प्रचंड चर्चेत आले होते.