बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित नेने लवकरच तिच्या पहिल्या मराठी चित्रपटात काम करणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या पहिल्या मराठी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले होते. सध्या ती या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. याच कारणासाठी तिने झी चित्र गौरव सोहळ्यात हजेरी लावली.

झी चित्र गौरव सोहळ्याच्या संध्याकाळी सर्व कलाकार तयारी करत होते. अचानक एक आलिशान गाडी बॅकस्टेजला येऊन थांबली. सर्वांच्या नजरा वळल्या आणि ती गाडी होती माधुरी दीक्षितची. सर्व कलाकारांसाठी हा एक सुखद धक्का होता. कारण कोणतीही कल्पना नसताना माधुरीने कार्यक्रमात एण्ट्री केली होती. त्यानंतर मेकअप रुममध्ये तिने निलेश साबळे आणि श्रेया बुगडे यांच्यासोबत एका स्किटचा सराव केला.
धकधक गर्ल स्टेजवर पोहोचताच टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी तिने तिच्या पहिल्या मराठी चित्रपटाची घोषणा केली, कलाकारांसोबत सेल्फी काढला आणि श्रेया बुगडेसोबत फुगडीसुद्धा खेळली.

PHOTO: ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मधील बिग बींचा लूक पाहिलात का?

दार मोशन पिक्चर्स, डार्क हॉर्स सिनेमाज् आणि ब्लू मस्टँग क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून माधुरीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्याचे पहिले पोस्टर प्रदर्शित केले होते. ‘बकेट लिस्ट’ चित्रपटात रेणुका शहाणेचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या दोघी तब्बल २३ वर्षांनी एकत्र काम करणार आहेत. याआधी माधुरी आणि रेणुका यांनी ‘हम आपके है कौन’ सिनेमात बहिणींची भूमिका साकारुन प्रेक्षकांची मनं जिंकली होती.