20 November 2017

News Flash

Home Minister Anniversary : ‘अभ्युदय नगरमधील सामान्य मुलाला होम मिनिस्टरने मोठं केलं’

१३ सप्टेंबर २००४ रोजी सुरु झालेल्या 'होम मिनिस्टर'ला आज १३ वर्षे पूर्ण झाली.

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 13, 2017 5:08 AM

होम मिनिस्टर, आदेश बांदेकर

महाराष्ट्रातील घराघरांत लोकप्रिय असलेला आणि ज्यात सहभागी व्हावे असे प्रत्येक महिलेचे स्वप्न असलेला कार्यक्रम म्हणजे ‘झी मराठी’वरील ‘होम मिनिस्टर’. प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करणाऱ्या या कार्यक्रमाला आज १३ वर्षे पूर्ण झाली. १३ सप्टेंबर २००४ रोजी ‘होम मिनिस्टर’चा पहिला भाग प्रदर्शित करण्यात आलेला. त्यानंतर आजतागायत या कार्यक्रमाची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम सादर करणारे सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांची दुसरी ओळख ही ‘भावोजी’ अशीच झाली. ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाला १३ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आदेश यांनी अविरत चालणाऱ्या या प्रवासातील काही आठवणी ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी शेअर केल्या.

‘महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन घराघरांतील स्त्रीचा सन्मान करण्याची ‘वनलायनर’ घेऊन आम्ही हा कार्यक्रम २००४ मध्ये सुरू केला. बघता बघता या कार्यक्रमाने अनेक घरांना सुखाचे क्षण दिले, नाती जोडली. हे सर्व अनुभवताना जो आनंद मिळत होता तो शब्दांत मांडणे केवळ अशक्य. एक मराठी कार्यक्रम सोमवार ते शनिवार एक दोन नाही तर तब्बल १३ वर्षे लोकांचे मनोरंजन करत राहील, याचा मी कधी विचारही केला नव्हता. त्यामुळे माझ्यासाठी हा खूप अभिमानाचा क्षण आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या वहिनी या काही अभिनेत्री नसतात, म्हणूनच कार्यक्रम करताना त्या घरातील वहिनी हिरोईन ठरावी आणि तिला ग्लॅमर मिळावे एवढाच प्रामाणिक विचार तेव्हा माझ्या मनात होता,’ असे आदेश बांदेकर म्हणाले.

वाचा : या फोटोतील आघाडीच्या मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का?

२००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आदेश माहिम मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून उभे राहिले होते. त्यावेळी त्यांनी या कार्यक्रमातून जवळपास सहा महिने ब्रेक घेतला होता. याविषयी सांगताना ते म्हणाले की, ‘राजकारणात गेल्यावर मी ब्रेक घेतला तेव्हा लोकांनी मला पुन्हा कार्यक्रमात येण्यासाठी भाग पाडले. तुम्ही राजकारण, समाजकारण काय हवे ते करा पण तुम्ही कार्यक्रम थांबवू नका, असा हट्ट लोकांनी माझ्याकडे केला. त्यानंतर मी कधीच थांबलो नाही. सोमवार ते शनिवार अविरत हा कार्यक्रम सुरु ठेवला.’

‘होम मिनिस्टर’मुळे अनेक कुटुंब जवळ आली. घरांमध्ये असणारे मतभेद या कार्यक्रमाच्या निमित्ताने दूर झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आदेश भावोजींनी ‘दार उघड बये दार उघड’ म्हटल्यावर त्यांचे स्वागत करणाऱ्या वहिनींनाही अविस्मरणीय असे क्षण अनुभवता आले. भावोजींसाठीही या प्रवासातील काही क्षण अविस्मरणीय आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून दोन बहिणी भेटल्या होत्या. हा प्रसंग ते कधीच विसरु शकत नाहीत. रुची आणि प्रियांका या दोन बहिणी लहान असताना हरवल्या होत्या. या कार्यक्रमाच्या माध्यमातून एका लग्नात या बहिणींची भेट करून देण्यात आली होती.

वाचा : PHOTOS संभाजींच्या भूमिकेत दिसणार हा मराठी अभिनेता

‘होम मिनिस्टर’मध्ये पैठणी मिळवण्याचे प्रत्येक गृहिणीचे स्वप्न असते. या कार्यक्रमामुळे पैठणीला अधिक लौकिक मिळाला, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. १३ वर्षांत होम मिनिस्टर आणि पैठणी हे एक समीकरण झाले. तसेच कार्यक्रमामुळे पैठणीच्या मागणीत लक्षणीय वाढ झाल्याचेही आदेश यांनी आवर्जून सांगितले.

अखेर माय-बाप रसिकांनी या कार्यक्रमाला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आभार मानताना ते म्हणाले की, ‘या कार्यक्रमामुळे मला माझे स्वतःचे घर घेता आले. घराबाहेर गाड्या उभ्या राहिल्या. सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्षपदही मिळाले. इतकेच नव्हे तर ‘माय फेअर लेडी’च्या माध्यमातून मला ६०-६५ वेळा परदेशवाऱ्या करण्याचा योगही आला. अभ्युदय नगरमधील एका मध्यमवर्गीय मुलाला या कार्यक्रमाने बाहेरच्या जगाची सफर घडवून दिली.’

First Published on September 13, 2017 4:59 am

Web Title: zee marathi home minister anniversary host adesh bandekar shares his experience of hosting the marathi show for 13 years