‘झी थिएटर’ नावाने ‘झील समूहा’चा नाटय़क्षेत्रात प्रवेश

आशयाच्या दृष्टीने परदेशातील जुन्या स्वरूपातील कार्यक्रम, शोज इथे नव्याने दाखवण्याचा प्रयत्न करून थकलेल्या वाहिन्यांनी अन्य पर्याय शोधण्यासाठी सुरुवात केली असतानाच हिंदीसह सगळ्याच भाषेतील नाटय़क्षेत्रात प्रवेश करत ‘झील समूहाने’ एक मोठे पाऊल पुढे टाकले आहे. रंगमंचावर घडणारे ते नाटक, कलाकारांना प्रत्यक्ष समोर अभिनय करताना पाहणे ही नाटकांची खरी ताकद आहे. नाटकाच्या या जिवंत शैलीला धक्का न लावता त्याला टीव्ही, मोबाइल या अत्याधुनिक माध्यमांतून आणि थेट सिनेमागृहातूनही दाखवण्याची किमया ‘झी थिएटर’ या अभिनव उपक्रमातून साधण्यात येणार आहे.

विजयाबाई मेहतांचे ‘हमीदाबाईची कोठी’, जयवंत दळवी लिखित ‘संध्याछाया’ अशी दर्जेदार नाटके हिंदी, मराठीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्ये रुपांतरित करून टीव्हीवर पाहता येणार आहेत. मात्र मुंबई-महाराष्ट्रात मोठया प्रमाणावर प्रेक्षक नाटय़गृहात जाऊन नाटक पाहणे पसंत करतात. मग या नव्या माध्यमांतून नाटक पाहणे प्रेक्षकांना रुचेल का? या प्रश्नावर उत्तर देताना ‘झील समूहा’ची खास प्रकल्प राबवणाऱ्या प्रमुख अधिकारी शैलजा केजरीवाल यांनी या उपक्रमाची व्याप्ती मोठी असल्याचे स्पष्ट केले. ‘झी थिएटर’च्या माध्यमातून नाटक टीव्हीवर दाखवणे एवढाच संकुचित उद्देश नाही. विजयाबाईंचे ‘हमीदाबाईची कोठी’ या नाटकाचेच उदाहरण घेतले तर मुंबईत अनेकांनी त्याकाळी हे नाटक पाहिले असेल. पण मुंबईबाहेरून आलेल्या कित्येकांना या नाटकाची माहिती असूनही पाहता आलेले नाही. असा खूप मोठा प्रेक्षकवर्ग देशभर पसरलेला आहे ज्यांना विविध भाषेतील दर्जेदार नाटकांची माहिती आहे, पण ती नाटके पाहता येणार नाहीत. अशी नाटके ‘झी थिएटर’ या बॅनरखाली पुन्हा रंगमंचावर आणली जाणार असल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली.

‘झी थिएटर’ हा उपक्रम हातात घेण्याआधी विजयाबाई मेहता, विजय केंकरे, शफाअत खान अशा कित्येक नाटककारांशी सखोल चर्चा करून, संशोधन करून देशभरातून विविध भाषेतील दर्जेदार नाटके निवडण्यात आली आहे. या नाटकांचे प्रयोग वेगवेगळ्या राज्यांत, शहरांत होतील. त्याचे चित्रीकरण होईल आणि मग हे नाटक मोबाइल, टीव्हीवर ‘ऑन डिमांड’ उपलब्ध होईल. पण मोठी महानगरे वगळता अनेक ग्रामीण भागात नाटय़गृहांची व्यवस्था नाही तिथे ही नाटके चित्रपटगृहांमधून दाखवण्यात येणार असल्याचे शैलजा केजरीवाल यांनी सांगितले. सध्या तेरा बॅचमध्ये या नाटकांचे सादरीकरण होणार असून पहिल्या बॅचमध्ये ‘हमीदाबाईची कोठी’, ‘संध्याछाया’, अतुल कुमार यांचे ‘बहुरूपियाँ’, ‘सविता दामोदर परांजपे’ ही नाटके देशभर दाखवली जातील.

विजयाबाई मेहतांचे खास दिग्दर्शन

‘झी थिएटर’ या उपक्रमांतर्गत ‘हमीदाबाईची कोठी’ हे नाटक हिंदीत सादर होणार आहे. या नाटकाच्या निमित्ताने विजयाबाईंनी पुन्हा एकदा दिग्दर्शन केले असून ज्येष्ठ अभिनेत्री हिमानी शिवपुरी या नाटकात प्रमुख भूमिकेत आहे. विजयाबाईंनी या उपक्रमाचे स्वागत केले असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. एकेक रंगकर्मी निवृत्त झाले किंवा काळाच्या पडद्याआड गेले की त्यांच्याबरोबर त्यांची अभिजात नाटकेही विस्मृतीत जातात. नव्या माध्यमांमुळे देशभरातील लोकांपर्यंत आणि अगदी नव्या पिढीपर्यंत आपले काम पोहोचेल याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले, असेही शैलजा यांनी सांगितले.