बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून त्याने आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. दरम्यान सिनेसृष्टीतील घराणेशाहीसाठी सलमान खानला जबाबदार धरले जात आहे. त्याच्यावर सोशल मीडियाद्वारे तुफान टीका होत आहे. या टीकाकारांना प्रत्युत्तर देण्यासाठी आता काँग्रेस आमदार झिशान सिद्धिकी पुढे सरसावले आहेत. सलमान एक दिलदार व्यक्ती आहे, त्याच्यावर असे आरोप करु नका. अशी विनंती त्यांनी टीकाकारांना केली आहे.

झिशान सिद्धिकी यांनी सलमानचे कौतुक करण्यासाठी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी २०१४चा एक किस्सा सांगितला आहे. कोणालाही न कळता मदत कशी करायची? हे त्यावेळी सलमानने त्यांना शिकवलं होतं. असा दिलदार माणूस कोणाचं वाईट कसं काय करु शकतो? असा प्रश्न त्यांनी या व्हिडीओद्वारे टीकाकारांना विचारला आहे. सिद्धिकी यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

यापूर्वी ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ (FWICE) ही कामगारांची संघटना देखील सलमानच्या मदतीसाठी पुढे सरसावली होती. सलमानच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत, असं त्यांनी एका पत्रकाद्वारे म्हटलं होतं. परंतु यानंतरही सलमान विरुद्धचा रोष अद्याप कमी झालेला नाही. त्याच्या विरोधात सुरु असलेल्या ऑनलाईन पिटिशनवर आता पर्यंत ३४ लाखांपेक्षा अधिक लोकांनी सह्या केल्या आहेत. तसेच गेल्या काही तासांत त्याचे ५५ हजार सोशल मीडिया फॉलोअर्स कमी झाले आहेत. यावरुनच सलमान विरुद्ध पेटलेला संताप आणखी वाढत असल्याचं दिसत आहे.