मराठी ब्लॉकबस्टर चित्रपट ‘सैराट’चा हिंदी रिमेक ‘धडक’ प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्याला दमदार प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई करणारा हा चित्रपट तरुणाईच्या पसंतीस उतरला आहे. ‘सैराट’मधल्या गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. आता ‘धडक’च्या निमित्ताने पुन्हा एकदा तिच क्रेझ पाहायला मिळत आहे. एका थिएटरमध्ये प्रेक्षकांनी झिंगाट गाण्यावर ताल धरला आणि हा व्हिडिओ करण जोहरने ट्विटरवर शेअर केला आहे.

‘धडक’मधल्या झिंगाट गाण्याच्या वेळी स्क्रिनसमोर येऊन प्रेक्षकांनी डान्स केल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. अगदी असाच प्रकार ‘सैराट’च्या वेळी विविध चित्रपटगृहांमध्ये पाहायला मिळालं होतं. सुरुवातीला ‘धडक’ची तुलना ‘सैराट’शी होऊ लागल्याने प्रेक्षकांच्या पसंतीस तो उतरणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. पण पहिल्याच दिवशी ‘धडक’ने दमदार कमाई केली.

वाचा : मादाम तुसाँ संग्रहालयात पोहोचली बॉलिवूडची ‘मस्तानी’

जान्हवी कपूर आणि इशान खट्टर या नवोदित कलाकारांची मुख्य भूमिका असलेला ‘धडक’ प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा चित्रपट किती कमाई करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.