विदर्भात प्रचंड लोकप्रिय असलेल्या झाडीपट्टी या नाटकाच्या खास प्रकारावर आधारित “झॉलीवूड” हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या ९ एप्रिलला हा चित्रपट चित्रटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकतेच सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले आहे.

चित्रपटाचा दिग्दर्शक तृषांत इंगळेने स्वतः झाडीपट्टी नाटकांतून बालकलाकार म्हणून काम केलं आहे. विदर्भात लोकप्रिय असलेल्या झाडीपट्टी नाटकांविषयी उर्वरित महाराष्ट्रात विशेष माहिती नाही. मात्र, झाडीपट्टी रंगभूमी हा अतिशय खास कलाप्रकार तर आहेच, पण झाडीपट्टी ही जणू एक इंडस्ट्रीच आहे. या प्रकारावर पहिल्यांदाच चित्रपट निर्मिती होत आहे.

तृषांतने इन्स्टाग्राम अकाऊंटवर “झॉलीवूड”चे पोस्टर शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. या पोसमध्ये, ‘झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे…. वर्ष निघून गेले. लोक म्हणाले जाऊ दे जेव्हा जे होईल ते होईल. हे ऐकत वाट बघत राहिलो. थिएटर सुरु झाले ऐकून आनंद झाला. आता सगळे विचारू लागले ‘तेरी फिल्म का क्या हुवा’ ? मी शांतच. असं बोलत बोलत लोक गंम्मत उडवायला लागले. पण मनातल्या गोष्टी मनात साठवून ठेवाव्या लागतात. आपलं स्वप्न आहे आणि ते पूर्ण होणार आपला सिनेमा थिएटरमध्ये येणार ही खात्री होती. आणि आज तुम्हाला सांगण्यात आनंद होतोय की 09 एप्रिल 2021 ला zollywood हा माझा पहिला मराठी चित्रपट घेऊन येतोय सिनेमा गृहात. फक्त आणि फक्त तुमच्यासाठी’ असे म्हटले आहे.

विशबेरी फिल्म्सच्या प्रियंका अगरवाल, अंशुलिका दुबे, शाश्वत सिंग यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून अमित मासूरकर आणि डयुक्स फार्मिंग फिल्म्स चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. “न्यूटन”, “सुलेमानी किडा” असे दर्जेदार चित्रपट दिग्दर्शित केलेले अमित मासूरकर या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्यूसर देखील आहेत.

चित्रपटसृष्टीत करिअर करण्याच्या विचाराने तृषांतनं वयाच्या १६व्या वर्षी मुंबई गाठली. त्यानंतर लेखन, कास्टिंग डिरेक्शनचा अनुभव घेत आता ‘झॉलीवूड” या चित्रपटाच्या रुपानं त्यानं पहिला चित्रपट दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाची कथा आसावरी नायडू, पटकथा तृषांत इंगळे, योगेश राजगुरू यांनी छायांकन वैभव दाभाडे यांनी संकलनाची जवाबदारी सांभाळली आहे.