मराठी चित्रपटसृष्टी प्रयोगशील आहे. काळानुसार चित्रपटांचे विषय आणि कथाही बदलत आहेत. नवनवीन प्रयोग मराठीत होताना दिसत आहेत. लवकरच ‘झोंबिवली’ हा नवीन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.

‘झोंबिवली’ चित्रपटाचा टीझरवरून हा भयपट असेल असा अंदाज आपण बांधू शकतो. या चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकर, अमेय वाघ, अभिनेत्री वैदेही परशुरामी यांच्या प्रमुख भूमिका असल्याचं टीझरवरून दिसून येत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलं आहे. या चित्रपटाची कथा झोम्बी या कल्पनेवर आधारित आहे. झोम्बी आले शहरात, घुसण्याआधी घरात, गाठा त्यांना 30 एप्रिलला जवळच्या थेटरात असं कॅप्शन देत अभिनेता अमेय वाघनेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चित्रपटाचा टिझर शेअर केला आहे आणि प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं आहे.

अभिनेता ललित प्रभाकरनं याचं पोस्टरही आपल्या सोशल मिडिया अकाऊंटला पोस्ट केलं आहे. मराठीतला पहिला झॉम्बी सिनेमा – ‘झोंबिवली’!!!! टीझर येत आहे उद्या, ते पोहोचतीलच, तुमच्या दारापर्यंत अशा कॅप्शनसह त्याने या सिनेमाविषयी आपल्या चाहत्यांना सांगितलं. ३० एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आत्तापर्यंत गेम्समध्ये, हॉलिवूड चित्रपटांमध्ये पाहिलेले झोम्बीज मराठी चित्रपटातही पाहायला मिळणार आहेत. रोमँटिक, जॉली भूमिका केलेले मराठी चेहरे हॉरर भूमिकेत दिसतील का हे पाहण्यासाठी मात्र 30 एप्रिलचीच वाट पाहावी लागेल.