व्ही. शांताराम प्रतिष्ठान आणि विवेक समूह यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या ‘चित्रपट आणि संगीत कोश’ तसेच गेल्या शंभर वर्षांतील मराठी चित्रपटांची सूची असलेल्या ‘शतकमहोत्सवी मराठी चित्रसंपदा’ या ग्रंथांचे प्रकाशन १६ जून रोजी मुंबईत विलेपार्ले येथे एका कार्यक्रमात होणार आहे.
दीनानाथ नाटय़गृह, विलेपार्ले येथे सायंकाळी साडेसात वाजता होणाऱ्या या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमिताभ बच्चन यांच्या हस्ते या ग्रंथांचे प्रकाशन होणार आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, खासदार पूनम महाजन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या ग्रंथात राज्यातील चित्रपट आणि संगीत कलेचा गेल्या २०० वर्षांच्या इतिहासाचा सांगोपांग आढावा घेण्यात आला आहे. चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील अनुक्रमे २५० व ३९० यांची चरित्रे, त्यांच्याशी संबंधित कलाकृतींची छायाचित्रे, परिशिष्ठे यांचा समावेश आहे. चित्रपट व संगीत कोश यांचे संपादन सुधीर नांदगावकर, डॉ. अर्चना कुडतरकर, चैतन्य कुंटे, माधव इमारते यांनी केले आहे. तर ‘शतकमहोत्सवी मराठी चित्रसंपदा’चे संकलन पत्रकार दिलीप ठाकूर यांनी केले आहे.
या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर हे डॉ. व्ही. शांताराम चरित्र-अभिवाचन सादर करणार असून ‘शांतारामा’ या ध्वनिफितीचे प्रकाशनही या वेळी केले जाणार आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीच्या दोनशे वर्षांचा व्यक्तिचित्रणात्मक आलेख साकारणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प विवेक समूहाने हाती घेतला आहे. त्याअंतर्गत चित्रपट व संगीत कोश तयार करण्यात आला आहे.