‘रईस’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रेल्वे प्रवास करणाऱ्या शाहरूख खानला पाहण्यासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकावर तुंबळ गर्दी ‘होत आहे. सोमवारी रात्री बडोदा रेल्वे स्थानकावर शाहरूख पोहोचला असता त्याला पाहण्यासाठी रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी उसळली होती. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्यामुळे एकच धावपळ उडाली. या गर्दीत गुदमरून एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले. मृत व्यक्ती ही माजी नगरसेवक असल्याचे समजते.

शाहरूख आपल्या टीमबरोबर ऑगस्ट क्रांती एक्स्प्रसेने मुंबईहून दिल्लीकडे रवाना झाला. सोमवारी रात्री १०.३० च्या सुमारास बडोदा रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर रेल्वे १० मिनिटे थांबली होती. या वेळी शाहरूखला पाहण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली होती, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
जेव्हा रेल्वे थांबली तेव्हा गर्दी अनावर झाली. त्यांनी रेल्वे डब्यांच्या खिडक्या वाजवण्यास सुरूवात केली. चाहते एकमेकांवर पडले. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना हलका लाठीमार करावा लागला. रेल्वे निघाल्यानंतर चाहतेही रेल्वेबरोबर पळू लागले. त्यामुळे धावाधाव सुरू झाली. यात एका व्यक्तीचा गुदमरून मृत्यू झाला. गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करणारे दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले.

मृत व्यक्ती ही माजी नगरसेवक फरहीद खान असल्याचे पोलिसांनी सांगितले. फरहीद खान हे समाजवादी पक्षाशी संबंधित असल्याचे समजते. बडोदा स्थानकावर शाहरूख खानला भेटण्यासाठी क्रिकेटपटू इरफान आणि युसूफ पठाणही आले होते.
शाहरूखने पहिल्यांदा दिल्ली ते मुंबई रेल्वेने प्रवास केला होता. चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल ढोलकिया आणि निर्मात रितेश सिधवानीही त्याच्याबरोबर आहेत. सोमवारी सांयकाळी ५.४० वाजता मुंबई सेंट्रलवरून रेल्वे निघाली होती.