बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्र एकमेकांशी बऱ्याच बाबतीत जोडले गेले आहेत. त्यातही असे काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते, ज्यांची जादू आजही कायम आहे. अशाच काही चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘चक दे! इंडिया’. महिला हॉकी संघाच्या प्रवासापासून ते अगदी विश्वचषकावर त्यांचं नाव कोरलं जाण्यापर्यंतचा सुरेख प्रवास या चित्रपटातून दिग्दर्शक शिमीत अमिनने मांडला होता. या चित्रपटामध्ये बॉलिवू़डचा किंग शाहरुख खानने भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती. अशा या चित्रपटामध्ये महिला हॉकी संघाला कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागतं आणि एक महिला खेळाडू म्हणून सर्वसामान्य मुलींना कोणत्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं याचं चित्रण करण्यात आलं होतं.
बॉक्सऑफिसवर चांगलीच कमाई करणाऱ्या या चित्रपटाला बॉलिवूडमध्ये १० वर्षे पूर्ण झाली आहेत. अशा या चित्रपटातील संवाद आजही अनेकांच्या लक्षात आहेत. पण, अशाही काही गोष्टी आहेत ज्या आजही समोर आल्या नसाव्यात चला तर मग जाणून घेऊया अशाच काही गोष्टींबद्दल…




या चित्रपटाच्या हॉकी सामन्यांच्या चित्रीकरणासाठी सिडनीमधील ऑलिम्पिक हॉकी स्टेडियमचा वापर करण्यात आला होता. त्यावेळी शाहरुखच्याच सांगण्यावरुन त्याच्या लोकप्रियतेचा वापर करत मैदानात गर्दी वाढवण्यात आली होती. त्यामुळे प्रेक्षक भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी ज्या आरोळ्या ठोकत होते, त्या खरंतर किंग खानमुळेच होत्या. कारण, अधूनधून तो प्रेक्षकांकडे हात दाखवायचा जे पाहून अर्थातच आपल्या आवडत्या अभिनेत्याचं हे रुप पाहून प्रेक्षत आरडाओरडा करण्यास सुरुवात करायचे.
शाहरुखने या चित्रपटामध्ये ‘कोच कबीर / कबीर खान’ ही भूमिका साकारली होती. भारतीय संघाचा खेळाडू असूनही पाकिस्तानी संघाच्या हिताचा विचार केल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला असून, त्याभोवतीच त्याची भूमिका आधारली होती. चित्रपटात घडलेला हा प्रसंग रंजन नेगी या खेळाडूवर हा आरोप लावण्यात आला होता. १९८२ मधील आशियाई क्रिडा स्पर्धांदरम्यान हा सर्व प्रकार घडला होता. पण, या चित्रपटाच्या लेखकाने मात्र आपण या सर्व गोष्टींबद्दल अनभिज्ञ असल्याचं म्हटलं होतं.
ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्री फ्रिडा पिंटोनेसुद्धा या चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती. पण, काही कारणास्तव तिची निवड झाली नव्हती.
पाहा : सलमान, हृतिकला टक्कर देतोय हा आयपीएस अधिकारी
चित्रपटाचे लेखक जयदीप साहनीने २००२ पासूनच या चित्रपटाच्या संकल्पनेवर काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर काही वर्षांनी अवघ्या दीड तासांच्या चर्चेतच आदित्य चोप्राने या चित्रपटाची निर्मिती करण्यात स्वारस्य दाखवलं होतं.
या चित्रपटाला फक्त प्रेक्षकांनीच नाही तर, १२- १३ वर्षांच्या खेळाडूपासून ते अगदी ७० वर्षांच्या महिला खेळाडूंनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. मुख्य म्हणजे चित्रपटाला असा प्रतिसाद मिळेल याची लेखक आणि दिग्दर्शकांनाही अपेक्षा नव्हती.