अॅक्शन व डान्सच्या बाबतीत एकमेकांना जबरदस्त टक्कर देणाऱ्या हृतिक रोशन व टायगर श्रॉफच्या ‘वॉर’ या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफीसवर तब्बल १६ विक्रम मोडले आहेत. तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाची कमाई २९१ कोटी रुपये इतकी झाली असून रविवारपर्यंत हा चित्रपट ३०० कोटींचा आकडा पार करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘वॉर’ चित्रपटापुढे ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’, ‘जोकर’, ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटांचं आव्हान होतं. पण अजूनही तिकीटबारीवर हृतिक-टायगरच्या अॅक्शनपटाची जादू कायम आहे.

‘वॉर’ने मोडलेले १६ विक्रम-
१. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५१.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. आमिर खानच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’चा विक्रम मोडत ‘वॉर’ने या यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे.
२. पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा हृतिकच्या आयुष्यातील पहिला चित्रपट ठरला. याआधी त्याच्या ‘बँग बँग’ चित्रपटाने २४.४० कोटी रुपये प्रदर्शनाच्या दिवशी कमावले होते. ‘वॉर’ने त्याच्या दुप्पट कमाई केली.
३. हृतिकसोबतच टायगरच्या आयुष्यातील प्रदर्शनाच्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ‘वॉर’ ठरला आहे. याआधी ‘बागी २’ने २५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.
४. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या करिअरमधील सर्वाधिक ओपनिंगचा चित्रपट
५. ‘गांधी जयंती’च्या दिवशी प्रदर्शित झालेला हा चित्रपट सुट्टीच्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
६. ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’, ‘जोकर’ असे तगडे चित्रपट टक्करला असतानाही ‘वॉर’ने सर्वाधिक कमाई केली.
७. सिक्वल किंवा रिमेक नसतानाही ‘वॉर’ने पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई केली.
८. ‘गांधी जयंती’च्या दिवशी प्रदर्शित झालेला ब्लॉकबस्टर चित्रपट.
९. या वर्षात पहिल्या तीन दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ‘वॉर’ ठरला आहे. पहिल्या दिवशी (बुधवारी) ५१.५० कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी (गुरुवारी) २२.५० कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी (शुक्रवार) २१ कोटी रुपये या चित्रपटाने कमावले आहेत. तीन दिवसांत ९५ कोटी रुपयांचा गल्ला जमवणारा हा या वर्षातील पहिला चित्रपट ठरला आहे.
१०. कमी दिवसांत १०० कोटींचा आकडा गाठणारा या वर्षातील पहिला चित्रपट.
११. पहिल्या आठवड्याअखेर या चित्रपटाने १५८ कोटी रुपयांची कमाई केली. सात दिवसांत एवढी कमाई करणारा हा या वर्षातील पहिला चित्रपट आहे.
१२. हृतिक व टायगरच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट- हृतिकच्या ‘क्रिश ३’ने १७५.८३ कोटी रुपये कमावले होते. तर टायगरच्या ‘बागी २’ने १६०.७४ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.
१३. सातव्या दिवशी ‘वॉर’ने २०० कोटींचा टप्पा गाठला होता. हृतिक व टायगरच्या करिअरमध्ये ‘डबल सेंच्युरी’ करणारा हा पहिलाच चित्रपट आहे.
१४. सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाचा विक्रम मोडत ‘वॉर’ने पहिल्या आठवड्यात २०६.५० कोटी रुपयांची कमाई केली. ‘बाहुबली २’, ‘सुलतान’नंतर हा तिसरा चित्रपट ठरला आहे.
१५. या वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या ‘उरी’चा विक्रम ‘वॉर’ने मोडला आहे. ‘उरी’ने २४४ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
१६. देशातच नव्हे तर परदेशातही ‘वॉर’ने चांगली कमाई केली आहे. १ कोटी १० लाख डॉलरची कमाई ‘वॉर’ने केली असून ‘भारत’ चित्रपटाचा विक्रम मोडला आहे.