scorecardresearch

“दिग्दर्शकाने माझ्या चेहऱ्यावरील हावभाव खरे वाटावे म्हणून…”, बिपाशा बासूने सांगितला ‘त्या’ हॉरर चित्रपटादरम्यानचा किस्सा

या चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बिपाशाने एक खास पोस्ट शेअर केली आहे

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू ही सध्या सिनेसृष्टीपासून दूर आहे. बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर मात्र ती चांगलीच सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. बिपाशाचा राझ हा चित्रपट प्रदर्शित होऊन २० वर्ष पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट तिच्या करिअरमधील महत्त्वाचा समजला जातो. या चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यासोबतच तिने चित्रपटाच्या शूटिंगदरम्याचे काही मजेशीर किस्सेही शेअर केले आहेत.

बिपाशा बासू म्हणाली की, या चित्रपटाचे शूटींग आम्ही उटीमध्ये करत होतो. यात बहुतांश सीन हे रात्रीच्या वेळी शूट करायचे होते. ज्यात मी जंगलातून येणाऱ्या आवाजाकडे जाते. आम्ही त्यावेळी ज्या बंगल्यात राहत होतो, त्यावेळी तेथील वातावरण फार थंड, भीतीदायक आणि भयानक होते. त्यात हिवाळ्याच्या दिवसात मला जंगलात एकटेच जायचे होते.

“या चित्रपटात काम करणारे अनेक कलाकार आणि क्रू हे पण मला फार घाबरवायचे. रात्रीच्या वेळी अनेकदा सरोज खान, आशुतोष राणा आणि विक्रम भट्ट यांच्यासह सर्वजण त्यांना आलेले विविध अनुभव सांगायचे. या अनुभवामुळे माझे घाबरण्याचे प्रमाण वाढले होते. याचा फायदा मला शूटींगदरम्यान झाला,” असेही बिपाशा म्हणाली.

या चित्रपटातील दिग्दर्शक विक्रम भट्ट यांनी माझ्यासोबत एक प्रँक केला होता. माझ्या चेहऱ्यावरील हावभाव खरे वाटावे यासाठी त्यांनी तो प्रँक केला होता. मात्र ते इतके भीतीदायक होते की मी फार घाबरली होती. त्यावेळी मी अक्षरश: जोरात ओरडली होती, असेही तिने म्हटले.

या चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बिपाशाने एक खास पोस्ट शेअर केली आहे. याला कॅप्शन देताना ती म्हणाली, “राझ- या चित्रपटासाठी आभारी आहे. राझ हा माझ्या पहिल्या काही चित्रपटांपैकी एक आहे…ज्याने मला लाखो लोकांच्या हृदयात थेट प्रवेश मिळवून दिला आणि अजूनही तुमच्या हृदयात ठेवल्याबद्दल धन्यवाद.”

‘राझ’ हा चित्रपट २००२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा एका तरुण जोडप्यावर आधारित आहे. ते त्यांचे वैवाहिक जीवन शांततेत घालवण्यासाठी उटीला येतात. मात्र ते राहत असलेल्या घरात एक अतृप्त आत्मा असते. जो त्यांचे नाते बिघडवण्याचा प्रयत्न करतो. त्यांना विविध पद्धतीने इजा पोहोचवतो. या चित्रपटात बिपाशा बसू, डिनो मोरिया आणि आशुतोष राणा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 20 years of raaz bipasha basu and dino morea went down memory lane and thanked the audience nrp

ताज्या बातम्या