‘डोण्ट वरी Be Happy’ नाबाद २००

अनेक जोडप्यांसाठी समुपदेशक ठरतंय ‘डोण्ट वरी Be Happy’

dont worry be happy play
'डोण्ट वरी Be Happy' नाटकाने २०० प्रयोगांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.

पती-पत्नीचे नाते आणि जगण्यातील तणाव यावर भाष्य करणाऱ्या “डोण्ट वरी Be Happy” या नाटकाने २०० प्रयोगांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. आताच्या बहुमाध्यमांच्या काळात एखाद्या नाटकाचे २०० प्रयोग होणं ही नक्कीच गौरवाची बाब आहे. हे नाटक म्हणजे अनेक जोडप्यांसाठी समुपदेशक ठरलं आहे.

अलीकडच्या काळात पती-पत्नीच्या नात्यावर आधारित अनेक नाटकं मराठी रंगभूमीवर आली. कौटुंबिक नाटकाची संकल्पना बाजूला ठेवत सध्याच्या काळाच्या नजरेतून बदलणारी नाती हा या नाटकांचा केंद्रबिंदू ठरला. सोनल प्रॉडक्शन्सच्या नंदू कदम निर्मित मिहीर राजदा लिखित आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शित ‘डोण्ट वरी Be Happy’ हे नाटकही बदललेला काळ आणि त्या अनुषंगानं पती-पत्नीचं बदलणारं नातं या विषयीच भाष्य करतं. ‘स्ट्रेस’ हा शब्द आपण फार गंभीरपणे घेत नाही. खरं तर तणावाचे परिणाम मनावर, शरीरावर होतात. त्याचा परिणाम शेवटी नातेसंबंधावर होतो.

dont-worry-be-happy-1

‘डोण्ट वरी Be Happy’ मधील अक्षय आणि प्रणोती यांची कथा म्हणजे कॉर्पोरेट जगतातील प्रत्येक मध्यमवर्गीय जोडप्याच्या घरात घडणारी स्ट्रेसफुल गोष्ट. मोठय़ा कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी करतानाच टार्गेटच्या सतत मागे लागणारा व बायकोला वेळ न देणारा अक्षय, तर स्वत:च्या करिअरमागे लागलेली, टीव्ही मालिकांमध्ये रमणारी नायिका. दोघांनी मूल जन्माला घालण्याचा निर्णय लांबणीवर टाकलाय, त्यातून लैंगिक संबंधाचे प्रश्न, अगदी मूल होणार नाही, ही शक्यता निर्माण होणे, मग दोघांनी परस्परापासून दूर जाणे, एकटेपण हे सारं नाटकात आहे. ही आजच्या युवा पिढीची व्यथा आहे. जोडप्यांमध्ये प्रेम आहे, पण रोमान्स संपला. व्यक्तिगत आणि सामाजिक आयुष्याचे संतुलन हरवलंय. अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिनेता उमेश कामत यांची जोडी या नाटकात आपल्याला पहायला मिळते.

dont-worry-be-happy-2

‘नाटकाचे २०० प्रयोग होणं हीच प्रेक्षकांची मोठी दाद आहे. हे नाटक लिहायला एक वर्ष लागलं आणि त्या नंतरच्या जवळपास दोन वर्षांत नाटकाचे २०० प्रयोग झाले. या नाटकाला येणारा प्रेक्षकवर्ग बहुतांशी तरूणच आहे. आम्हाला जे म्हणायचं होतं, ते नेमकेपणानं पोहोचतंय, याचीच ही पावती आहे. स्वाभाविकच नाटकाची टीम खूप खूश आहे’ असं नाटककार मिहीर राजदा यांनी सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 200 th play of marathi drama dont worry be happy