दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन यांचा २०१० मध्ये ‘रोबोट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला . या चित्रपटाच्या यशानंतर तब्बल ८ वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वल ‘2.0’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र यावेळी या चित्रपटामध्ये पहिल्यांदाच रजनीकांत आणि अक्षयकुमारने स्क्रिन शेअर केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातून पुन्हा एकदा रजनीकांत यांनी बॉक्स ऑफिसवर त्यांचं राज्य कायम ठेवलं आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बक्कळ कमाई केल्याचं दिसून येत आहे.

एस. शंकर दिग्दर्शित ‘ 2.0′ मध्ये तंत्रज्ञान आणि कथा यांचा उत्तम मेळ मध्ये घालण्यात आला असून चित्रपटाचं कथानक रोबोट चिट्टीच्या भोवती फिरताना दिसून येतं. यात रोबोट चिट्टीची भूमिका रजनीकांत यांनी वठविली आहे. रजनीकांत कायमच त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. तर अक्षयकुमारही त्याच्या साहसदृश्यांसाठी लोकप्रिय आहे. या दोघांच्याही या वैशिष्ट्यांचा या चित्रपटात समावेश करण्यात आला असून त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या भूमिकांना न्याय दिल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच त्यांना जोड मिळाली आहे ती त्यांच्या रंगभूषेची आणि संवादकौशल्यांची. या चित्रपटात उत्तम संवादशैलीचा वापर करण्यात आला असून रंगभूषेवरही तेवढाच जोर देण्यात आला आहे. खलनायकाची भूमिका साकारण्यासाठी अक्षय तब्बल ४ तास मेकअप करण्यासाठी देत होता.

चित्रपटामध्ये अक्षयची भूमिका दामदार असून रजनीकांत यांची भूमिकाही त्याला तोडीस तोड देणारी आहे. रजनीकांतची एण्ट्री झाल्यानंतर काही काळातच रोबोट चिट्टी प्रेक्षकांच्या भेटीला येतो आणि बघता बघता त्याच्यासारखेच ५०० आणखी रोबोट तयार होतात. त्यामुळे या चित्रपटामध्ये क्लॅमॅक्सचा पुरेपूर वापर केला असून तो कोठेही कंटाळवाणा होणार नाही याकडे लक्ष देण्यात आलं आहे. या कारणास्तव चित्रपटाच्या मध्यंतरापर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांची उत्सुकता हळूहळू वाढवत जातो.

चित्रपटातील व्हीएफएक्सवर तब्बल ५५० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या चित्रपटाची केवळ भारतातच नाही तर सातासमुद्रापार साऊथ बेल्ट, सिंगापूर, मलेशिया, पाकिस्तान या ठिकाणीही क्रेझ असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे अक्षय-रजनीचा हा पहिल्यांदाच स्क्रिन शेअर केलेल्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला जमवल्याचं पाहायला मिळालं.

दिग्दर्शक एस. शंकर यांनी चित्रपटातील प्रत्येक गोष्टीतील बारकावे उत्तमरित्या उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे चित्रपटातील पाच सीनपैकी चार सीन हे व्हीएफएक्सने परिपूर्ण आहेत. मनोरंजन एवढाच या चित्रपटाचा उद्देश नसून यात सामाजिक संदेशही दडला आहे. मात्र यात भावनिक दृश्यांना फारस प्राधान्य न दिल्याचंही दिसून येतं. यात केवळ दोन गाण्यांचा समावेश करण्यात आला असून त्यांना ए.आर.रेहमानचं संगीत लाभलं आहे.