प्रत्येक नवीन पिढीगणिक ज्या सिनेमाची प्रेक्षकसंख्या वाढतच जात आहे, त्या ‘शोले’ त्रिमिती अवतार (थ्रीडी) तीन जानेवारीला दाखल होतोय. या सिनेमाच्या अनेक वैशिष्टय़ांपकी एक म्हणजे त्याचं पाश्र्वसंगीत. संगीतकार राहुलदेव बर्मनच्या कल्पकतेतून साकारलेल्या या आविष्काराविषयी..
१५ ऑगस्ट १९७५ या दिवशी प्रदर्शित झालेला ‘शोले’ उपग्रह वाहिन्यांमुळे कितीदा टीव्हीवर दाखवला गेला असेल, याची गणती नाही. लोणचं मुरावं तसा मुरलाय हा सिनेमा. एवढा बहुचर्चित सिनेमा आजवर झाला नाही. यातील संवाद, अभिनय, गाणी, थरारक तसेच विनोदी प्रसंग यावर आम पब्लिक भरभरून बोलताना दिसतं. मात्र, या सगळ्या घटकांच्या जोडीला त्यातील पाश्र्वसंगीतानेही तितकीच तोलामोलाची कामगिरी करून ठेवली आहे, याकडे बहुसंख्य प्रेक्षकांचं लक्ष जात नाही, अर्थात, त्यात त्यांचा काही दोष नाही, कारण अ‍ॅक्शन सिनेमातील पाश्र्वसंगीत म्हणजे ट्रंपेट, व्हायोलीन आणि तालवाद्यांचा ढणढणाट अशीच कल्पना आपल्याकडे रुजलेली. या कल्पनेला पंचमने इथे जोरदार तडाखा दिलाय.
या सिनेमाचं बहुतांश चित्रीकरण हे बंगळुरू-म्हैसूर मार्गावरच्या रामनगरमधील विस्तीर्ण, खडकाळ लोकेशनवर झाल्याने प्रत्येक फ्रेममध्ये एक प्रकारची भव्यता दिसते. ही भव्यता व प्रत्येक प्रसंगाचा मूड ओळखून पंचमने अतिशय विचारपूर्वक पाश्र्वसंगीत दिलं आहे. त्या त्या प्रसंगाचं गांभीर्य, संवादांचं महत्त्व, ठाकूर, गब्बर, जय, वीरु यांचा अभिनय हे सारं उठून दिसेल अशा प्रकारचं नसर्गिक पाश्र्वसंगीत त्याने योजलं आहे, जे तोपर्यंत घडलं नव्हतं.
सिनेमाच्या श्रेयनामावलीपासूनच पाश्र्वसंगीताचं हे वेगळेपण दिसून येतं. ठाकूर बलदेव सिंगला भेटायला आलेला पोलीस अधिकारी आणि ठाकूरचा विश्वासू नोकर रेल्वे स्थानकापासून ठाकूरच्या हवेलीपर्यंत घोडय़ावरून जाताना ही टायटल्स येतात. यासाठी गिटार (भूपिंदर सिंग, भानू गुप्ता, आर के दास) फ्रेंच हॉर्न, तबलातरंग आणि तार शहनाई (दक्षिणामोहन टागोर) यांच्या वाद्यमेळातून पंचमने दिलखेचक परिणाम साधलाय. (नंतर याच सुरावटीच्या आधारे पंचमने ‘आझाद’मधील ‘राजू चल राजू’ हे गाणं केलं.)
खलनायकाचे प्रसंग म्हणजे जास्तीतजास्त लाऊड म्युझिक हा समज पंचमने इथे पार पुसून टाकलाय. ‘कितने आदमी थे’, हा सीन आठवा. केवळ गब्बरचा लोखंडी पट्टा आणि त्याच्या बुटांचा आवाज, याला जोड आहे ती केरसी लॉर्ड यांचा ऑर्गन बासू चक्रवर्ती यांच्या चेलोची. याचा एकत्रित परिणाम गब्बरची दहशत निर्माण करतो. दुसरा महत्त्वाचा प्रसंग म्हणजे ठाकूरच्या कुटुंबाला मारलं जातं तो. या प्रसंगात केवळ गोळ्यांचे आवाज व झोपाळ्याची थरकाप उडवणारी किरकिर ऐकू येते. घोडय़ाच्या संथ टापांमुळे यातील भेसूरता आणखी वाढते. यात त्या लहानग्यालाही मारलं जातं, ते भयानक क्रौर्य थेट दाखवणं टाळून त्या गोळीच्या आवाजाची ट्रेनच्या ब्रेकशी सांगड घालण्याची कल्पकता पंचम व रमेश सिप्पीने दाखवली आहे. यानंतर ठाकूर आपल्या प्रियजनांची कलेवरं पाहत असताना पंचमने सारंगीचा हुकमी वापर केला आहे.
‘ये हाथ मुझे दे दे ठाकूर’  हा फ्लॅशबॅक संपतो तेव्हा व्हायोलीनच्या ताफ्याचा मोह पंचमने टाळलाय. ठाकूरची शाल उडते तेव्हा केवळ वाऱ्याचा भीषण आवाज पाश्र्वसंगीतात ऐकू येतो. हेच वेगळेपण पंचमने जय आणि ठाकूरच्या सुनेमधील अव्यक्त नात्यात दाखवलंय. यासाठी भानू गुप्ता यांनी वाजवलेल्या माऊथ ऑर्गनला दाद द्यावी लागेल. बसंती व डाकूंच्या पाठलाग प्रसंगात तर पंचमने कमालच केली आहे. अशा प्रसंगात ट्रंपेट आणि व्हायोलीनचा भडिमार ठरलेला, मात्र यासाठी पंचमने पाचारण केलं ते तबल्यातील आपले गुरू पं. सामताप्रसाद यांना, सोबत पंचमच्या तालविभागाचे प्रमुख मारुती कीर. या दोघांनी तबला, ढोलक, घुंगरू यांच्या सहाय्याने हा प्रसंग वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलाय.
शेवटून दुसऱ्या हाणामारीत जखमी अवस्थेतील एकाकी जय डाकूंना तोंड देत असतो तेव्हाही गोळ्यांच्या आवाजाचा अपवाद सोडला तर भयाण सन्नाटा अनुभवण्यास मिळतो, ढासळणाऱ्या पुलाची करकर हा सन्नाटा गडद करते. जयच्या अंत्यसंस्काराच्या वेळी फरफर जळणाऱ्या लाकडांचा आवाज अस्वस्थ करतो, सोबत जयची ओळख असणाऱ्या माऊथ ऑर्गनचे मंद सूर..१८८ मिनिटांच्या या भव्य चित्रपटाच्या प्रत्येक प्रसंगात पंचमने आपली छाप सोडली आहे. हा सिनेमा ठाकूर, गब्बर, वीरू आणि जय या चौघांभोवती फिरतो आणि या पात्रांचं महत्त्व आपल्या मनावर ठसतं ते या आगळ्यावेगळ्या पाश्र्वसंगीतामुळे. बदलत्या तंत्रज्ञानानुसार या सिनेमाचा थ्रीडी अवतार आता भले येत असेल, मात्र हे ‘आरडी’एक्स त्यातून वेगळं करणं शक्य नाही. ते कालातीत आहे.