ऑक्टोबर २०२५ मध्ये ‘कांतारा: चॅप्टर १’ रिलीज झाला, त्याच्या एका आठवड्यानंतर एक प्रादेशिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा कमी बजेटचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल, अशी कोणी कल्पनाही केली नव्हती. या चित्रपटाचं नाव ‘लालो: कृष्ण सदा सहायते’. फक्त ५० लाख रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला ‘लालो: कृष्ण सदा सहायते’ हा गुजराती चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार तर एक-दोन आठवडे टिकेल, असं वाटत होतं. सुरुवातीचे कलेक्शनचे आकडेही फार चांगले नव्हते. पण बॉक्स ऑफिसवरील प्रवास संपला तेव्हा या चित्रपटाने जगभरात तब्बल १२० कोटींहून जास्त कमाई केली.
इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कनुसार, ‘लालो’ने पहिल्या आठवड्यात ३३ लाख रुपये आणि दुसऱ्या आठवड्यात २७ लाख रुपये कमावले. दोन आठवड्यानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांना केवळ १० लाख रुपयांचा नफा झाला होता. चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमधून काढला जाईल, असा अंदाज चित्रपट तज्ज्ञ वर्तवत होते. पण नंतर या चित्रपटाने सर्व अंदाज फोल ठरवत बॉक्स ऑफिस गाजवलं.
‘लालो’चे कलेक्शन
तिसऱ्या आठवड्यात ‘लालो’ची कमाई अचानक वाढली. सिनेमाने ६२ लाख रुपये कमावले. चौथ्या शनिवारी तर एका दिवसात चित्रपटाने १ कोटी रुपये कमावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. चौथ्या रविवारी चित्रपटाने १.८५ कोटी कमावले. ४ आठवड्याच्या शेवटी ‘लालो’चे एकूण कलेक्शन १२.८ कोटी झाले होते. त्यानंतर कलेक्शनमध्ये सातत्याने वाढ होत गेली. ‘लालो’ पाहण्यासाठी प्रेक्षक तुफान गर्दी करत होते. जवळपास ३ महिने हा चित्रपट थिएटरमध्ये चालू होता. या चित्रपटाने जगभरात १२०.५८ कोटी कलेक्शन केले.
‘लालो’च्या तुलनेत ‘धुरंधर’चं यश मोठं नाही
‘लालो’ हा सर्वाधिक कमाई करणारा गुजराती चित्रपट ठरला आहे. तसेच १०० कोटी रुपयांची कमाई करणारा पहिलाच चित्रपट ठरला आहे. बजेट व कलेक्शनची गोळाबेरीज केल्यावर लक्षात येतं की लालोने तब्बल २३,९०० टक्के नफा कमावला आहे. रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’सारखे मोठे बजेट असलेले चित्रपट २५० कोटी रुपयांच्या बजेटनंतर पाच ते सहा पट कमाई करून चर्चेत असताना, ‘लालो’च्या नफ्याची टक्केवारी खूपच जास्त आहे.
‘लालो’ने प्रादेशिक चित्रपटांनाही टाकलं मागे
‘लालो’ या चित्रपटाने ‘प्रेमलू’ आणि ‘मंजुम्मेल बॉईज’ सारख्या कमी बजेटच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांनाही मागे टाकलं आहे. त्या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आणि प्रादेशिक सिनेमांच्या कलेक्शनचे विक्रम मोडले असले तरी, ते अनुक्रमे ५ कोटी आणि २० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवले गेले होते.
‘लालो’ हिंदीमध्ये होणार रिलीज
‘लालो: कृष्ण सदा सहायते’ हा चित्रपट देशभरात हिंदी भाषेत ९ जानेवारी रोजी रिलीज करण्यात आला आहे. अवघ्या तीन महिन्यांनी ‘लालो: कृष्ण सदा सहायते’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
