अॅण्ड दी ऑस्कर गोज् टू….ला ला लॅण्ड’ अशी घोषणा झाली तेव्हा संपूर्ण सभागृहात ला ला लॅण्ड या चित्रपटाच्या टीमचाच जल्लोष पाहायला मिळत होता. या चित्रपटाची संपूर्ण टीम व्यासपिठावर पुरस्कार घ्यायला पोहोचली, एवढेच काय तर काहींनी हा पुरस्कार मिळाल्याचे आभार प्रदर्शनही केले. पण त्यानंतर माशी शिंकल्याप्रमाणे हा पुरस्कार चुकून ला ला लॅण्डला देण्यात आल्याचे समोर आले. यंदाच्या वर्षी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘ला ला लॅण्ड’ या चित्रपटाला सर्वांधिक म्हणजे १४ मानांकने मिळाली होती. त्यामुळेच सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कारही या चित्रपटालाच मिळेल, असा विश्वास प्रेक्षकांना वाटत होता.

पण, आयोजकांनी सुरुवातीला ‘ला ला लॅण्ड’ची सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून घोषणा  केली. पण खरा सर्वोत्कृष्ट चित्रपट तर ‘मूनलाइट’ हा होता. आयोजकांना त्यांचा गोंधळ लक्षात आल्यावर त्यांनी लगेच त्यात दुरुस्ती केली. पण, आयोजकांच्या या सावळ्या गोंधळानंतर ‘ला ला लॅण्ड’ चित्रपटाला यंदाच्या पुरस्कारसोहळ्यात  पाच पुरस्कारांवर समाधान मानावे लागल्याचे स्पष्ट झाले. सर्वोत्कृष्ट चित्रपटाची घोषणा करताना  झालेल्या गोंधळामुळे दोन्ही चित्रपटातील सदस्य व्यासपीठावर एकत्र आल्याचे चित्रही  पाहायला मिळाले.

सर्वोत्कृष्ट चित्रपटच्या विभागात ‘अरायव्हल’ (Arrival), ‘फेन्स’ (Fences), ‘हॅकसॉ रिज’ (Hacksaw Ridge), ‘हेल ऑर हाय वॉटर’ (Hell or High Water), ‘ला ला लॅण्ड’ (La La Land), ‘लायन’ (Lion), ‘मूनलाइट’ (Moonlight), ‘मँचेस्टर बाय द सी’ (Manchester By the Sea) या चित्रपटांना नामांकन मिळाले होते. या सर्व चित्रपटांपैकी ‘ला ला लॅण्ड’ला अनेकांनी प्राधान्य दिल्याचे दिसले. प्रेक्षक वर्गाची ही इच्छापूर्ण झाल्याचे पहिल्यांदा केलेल्या घोषणेनंतर वाटले. मात्र काही क्षणातच या नावामध्ये बदल करत ‘मूनलाइट’ चित्रपटला सर्वोत्कृष्ट म्हणून गौरविण्यात आले. अर्थात सर्वाधिक मानांकन मिळविणाऱ्या ‘ला ला लॅण्ड’वर ‘मूनलाइट’ भारी पडला.

‘ला ला लॅण्ड’ चित्रपटासाठी एमा स्टोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, दिग्दर्शक डेमियन चेजेलला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ‘सिटी ऑफ स्टार्स’ गाण्याला सर्वोत्कृष्ट ओरिजनल साँग पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोरसह सर्वोत्कृष्ट सिनेमेटॉग्राफीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.