एकीकडे जरी करोना महामारीने संपूर्ण देशात हाहाकार माजला असला तरी या संकट काळात सर्व जण एकत्र येऊन संकटाचा सामना करत असल्याचे दिसून येत आहेत. तसंच एकमेकांच्या मदतीला धावून येत आहेत. देशाची ‘गानकोकिळा’ अशी ओळख असलेल्या ९१ वर्षीय गायिका लता मंगेशकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ७ लाख रूपये देऊन मदतीचा हात पुढे केला आहे. नुकतंच महाराष्ट्र डीजीआयपीआरच्या ट्वीटर अकाऊंटवरून ही माहिती देण्यात आलीये.

महाराष्ट्र डीजीआयपीआरच्या या ट्वीटमध्ये लिहीलंय की, “भारतरत्न लता मंगेशकर यांनी #मुख्यमंत्रीसहायतानिधी #COVID_19 साठी ७ लाख रुपयांची दिली मदत. या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे मानले आभार. जास्तीत जास्त नागरिकांनी या निधीत मदत देऊन कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सहाय्य करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन”.

महाराष्ट्राच्या या कठीण परिस्थितीत ‘गानकोकिळा’ लता मंगेशकर यांनी केलेल्या मदतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले. करोना विरोधात लढाईसाठी आर्थिक मदत देणाऱ्यांसाठी राज्य शासनाने कोविड १९ मुख्यमंत्री सहायता निधीची स्थापन केली आहे.

महाराष्ट्र डीजीआयपीआरने शेअर केलेल्या ट्वीटमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीबाबत माहिती देणारे एक टेम्प्लेट देखील शेअर केलं आहे. तसंच जास्तीत जास्त नागरिकांनी या निधीत मदत देऊन करोना विरुद्धच्या लढाईसाठी सहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलं आहे.