सुपरहिरोची कथा म्हणजे फँटसी आली. त्यामुळे तर्काच्या अनेक गोष्टी बाजूला पडतात. पण चित्रपटाच्या नावाशी, विषयाशी प्रामाणिक राहत दिग्दर्शक रेमो डिसूझाने एक हलकाफु लका चित्रपट देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘फ्लाईंग जाट’ या चित्रपटाच्या काही गोष्टी खूप वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. फँटसीला प्रदूषणाच्या विषयाची जोड देत एक काल्पनिक सुपरहिरो कथा देण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे. मात्र त्या विषयाचा फार मर्यादित प्रभाव प्रेक्षकांवर पडतो.
हॉलीवूडपटांतील यच्चयावत सुपरहिरोंची एव्हाना प्रेक्षकांना ओळख झाली आहे. अगदी देशी सुपरहिरो म्हणून ‘क्रिश’ अवतारही लोकांनी डोक्यावर घेतला. मात्र सुपरहिरो म्हटला की तो त्याचा कॉस्च्युम घालून थेट जगाला वाचवायच्या कामगिरीवर निघतो, हे आपल्या अंगवळणी पडले आहे. मग त्याच्या व्यक्तिरेखेत थोडय़ाफार फरकाने गोष्टी बदललेल्या दिसतात. ‘फ्लाईंग जाट’मधला सुपरहिरो पाहताना कित्येकदा स्पायडर मॅनपटाची आठवण होते. म्हणजे त्यात साधम्र्य आहे असे नाही. पण स्पायडरमॅन ही व्यक्तिरेखा घडतानाही पीटर पार्कर हा मध्यम चणीचा, सतत हरणारा, हुशार पण कोणावरही प्रभाव पाडू न शकणारा असा चश्मा घातलेला तरुण डोळ्यासमोर येतो. इथेही आपल्याला तसाच हरणारा, शाळेत मार्शल आर्ट शिक्षक म्हणून घडी बसवण्याच्या प्रयत्नात असलेला, आपल्या प्रेयसीला प्रभावित करण्यासाठी धडपडणारा अमन (टायगर श्रॉफ) दिसतो. इतर कोणत्याही सुपरहिरोपेक्षा स्पायडरमॅनच्या कथेत त्याच्या कुटुंबाचा, प्रेयसीचा-मित्राचा संदर्भ त्याच्या पूर्ण जडणघडणीत आहे. अमनच्याही आयुष्यात त्याचा भाऊ रोहित (गौरव पांडे) आणि त्याची आई बेबे (अमृता सिंग) यांचा मोठा वाटा आहे. अमनचे वडील कर्तार सिंह यांच्या पराक्रमाचे गोडवे बेबे त्याला सतत ऐकवत राहते, त्या पराक्रमाच्या छायेखाली वावरणाऱ्या अमनला आपण भित्रे आहोत, त्यांच्यासारखे पराक्रमी नाहीत, हा सल आहे. भरीस भर शहरातील उद्योगपती मल्होत्राला (के. के. मेनन) अमनच्या वडिलांची जमीन हवी आहे आणि बेबे त्याला कडाडून विरोध करते आहे. या सगळ्या पाश्र्वभूमीवर अमनला जेव्हा त्याला मिळालेल्या दैवी शक्तीची जाणीव होते तेव्हाही हा सुपरहिरो गडबडतो. अरे.. जा.. जगाला वाचव म्हणून त्याला बेबेचे बाहेर हाकलणे, सुपरहिरोचे कॉस्च्युम घातल्यानंतरही काय करायचे हे न कळून इथे-तिथे पळणारा अमन या गोष्टी चित्रपटात मजेशीरपणे रंगवल्या आहेत. त्यामुळे हा सुपरहिरो अधिक आपला वाटतो.
दिग्दर्शक म्हणून अमनला सुपरहिरो बनवताना त्याला सरदारांविषयी असणारे गैरसमज, विनोद, त्या विनोदामागे असलेली जाटांच्या पराक्रमाची कथा याचा रेमोने खुबीने वापर करून घेतला आहे. त्यामुळे जाट या विषयावरून चित्रपट जराही इकडेतिकडे सरकत नाही. त्याचवेळी चित्रपटाचा खलनायक राका (नॅथन जोन्स)उभा करताना त्याला वाढत्या प्रदूषणाचे प्रतीक म्हणून समोर आणण्याची रेमोची कल्पनाही वेगळी आहे. मात्र त्या कल्पनेचा वापर करताना तो विषय म्हणून चित्रपटभर प्रभावीपणे मांडण्यात त्याला फारसे यश आलेले नाही. प्रदूषणावर मल्होत्राने केलेला खोटा दावाही फुसका असल्याने त्याला फारसे महत्त्व येत नाही. प्रदूषणाला खलनायक म्हणून समोर ठेवताना त्याला दूर करण्यासाठी पर्यावरणाबद्दलची जागरूकता आणि त्यासाठीचे प्रयत्नही सुपरहिरोच्या माध्यमातून पुढे यायला हवे होते. मात्र ते तसे येत नाहीत आणि आपला फ्लाईंग जाट प्रेयसी कीर्ती (जॅकलिन) आणि राकाबरोबरची मारामारी यातच अडकतो, फसतो. रेमो स्वत: उत्तम कोरिओग्राफर असल्याने चित्रपटाची गाणीही देखणी होऊन पडद्यावर उतरली आहेत. गाण्यांसाठी त्याने टायगर आणि जॅकलिनचा उत्तम वापर करून घेतला आहे. नाहीतर नाचण्याशिवाय आणि बागडण्याशिवाय जॅकलिनला कामच उरले नसते. टायगर श्रॉफ, अमृता सिंग आणि गौरव पांडे या तिघांच्याही केमिस्ट्रीने चित्रपटात रंगत आणली आहे. टायगरचा हा आणखी एक चांगला चित्रपट ठरला आहे. रेमोने ज्या कल्पना वापरून चित्रपट घडवला त्या अधिक धारदार, तपशीलवार विकसित केल्या असत्या तर विनोदी ढंगातील हा सुपरहिरो अधिक प्रभावी आणि वेगळा ठरला असता.
फ्लाईंग जाट
निर्माती – एकता कपूर
दिग्दर्शक – रेमो डिसूझा
कलाकार – टायगर श्रॉफ, अमृता सिंग, गौरव पांडे, नॅथन जोन्स, के. के. मेनन आणि जॅकलिन फर्नाडिझ.
संग्रहित लेख, दिनांक 28th Aug 2016 रोजी प्रकाशित
चित्ररंग : विनोदी ढंगातील देशी सुपरहिरो
रेमो स्वत: उत्तम कोरिओग्राफर असल्याने चित्रपटाची गाणीही देखणी होऊन पडद्यावर उतरली आहेत.
Written by रेश्मा राईकवार

First published on: 28-08-2016 at 01:42 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A flying jatt review by reshma raikwar