Jayasurya Responds To Sexual Misconduct Allegations : अभिनेता जयसूर्याने त्याच्यावर लावण्यात आलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांवर अखेर मौन सोडले आहे. हेमा समितीच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर जयसूर्याने त्याच्या महिला सहकलाकारांबरोबर अयोग्य वर्तन केल्याचे आरोप केले होते. या प्रकरणातील अनेकांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्याने जयसूर्यावर विनयभंगाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या घडामोडींना प्रतिसाद म्हणून सध्या अमेरिकेत असलेल्या जयसूर्याने या प्रकरणातील बाजू स्पष्ट करणारे एक निवेदन जारी केले. “आज माझ्या वाढदिवशी मला शुभेच्छा देणाऱ्या तुम्हा सर्वांना, तुमचा पाठिंबा देणाऱ्या आणि माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या सर्वांचे आभार”, असं ३१ ऑगस्ट रोजी त्याने त्याच्या ४६ व्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलंय.
या ‘खोट्या आरोपांमुळे’ त्याला, त्याच्या कुटुंबाला आणि प्रियजनांना मानसिक त्रास झाल्याचं तो म्हणाला. निवदेनात त्याने म्हटलंय की, “माझ्या कर्तव्यामुळे, माझे कुटुंब आणि मी गेल्या महिनाभरापासून अमेरिकेत होतो आणि या काळात माझ्यावर लैंगिक छळाचे दोन खोटे आरोप करण्यात आले. अगदी साहजिकच यामुळे मी, माझे कुटुंबीय आणि माझे प्रियजन हादरून गेलो आहोत.”
असत्य नेहमीच सत्यापेक्षा वेगाने प्रवास करतं
तसंच, या प्रकरणी तो कायदेशीररित्या समोरे जाणार असल्याचंही त्याने स्पष्ट केलं आहे. “मी कायदेशीर मार्गाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. माझी कायदेशीर टीम या प्रकरणातील उर्वरित कार्यवाही पाहणार आहे. सद्सद्विवेकबुद्धी नसलेल्या व्यक्तीला खोटे आरोप करणे सोपे असते. मला फक्त आशा आहे की एखाद्याला हे लक्षात येईल की छळवणुकीच्या खोट्या आरोपाचा सामना करणे हे छळवणुकीप्रमाणेच वेदनादायक आहे. असत्य नेहमीच सत्यापेक्षा वेगाने प्रवास करतं. पण मला विश्वास आहे की सत्याचा विजय होईल.”
माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास
जयसूर्याने भारतात परतण्याची अचूक तारीख सांगितली नसली तरी, त्याने सांगितले, “इथलं माझं काम पूर्ण होताच मी परत येणार आहे. माझं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी सर्व कायदेशीर कार्यवाही सुरू राहील. माझा आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. हा वाढदिवस सर्वात वेदनादायी बनवण्यात ज्यांनी योगदान दिले त्यांचे आभार.”
Jayasurya provides a detailed explanation that he is falsely alleged pic.twitter.com/9ixknNL0Gi
— Friday Matinee (@VRFridayMatinee) September 1, 2024
जयसूर्या व्यतिरिक्त प्रख्यात अभिनेते मुकेश, एडावेला बाबू, मनियानपिल्लई राजू आणि चित्रपट निर्माते रंजित यांच्यावरही अनेक अभिनेत्रींनी लैंगिक वर्तनाचे आरोप केले आहेत. त्यामुळे असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही आर्टिस्ट (एएमएएमए) च्या कार्यकारी समितीतील सदस्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे.