काही चित्रपटांना मोठ्या मल्टिप्लेक्सची, ओटीटी प्लॅटफॉर्मची, मोठ्या स्टार्सची किंवा प्रमोशनची गरज नसते. त्यांची कथा प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचण्यासाठी पुरेशी असते. नुकताच प्रदर्शित झालेला एक चित्रपटही याच श्रेणीत मोडतो.

यूट्यूबवर नुकताच एक चित्रपट प्रदर्शित झाला आहे, जो हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. या चित्रपटाच्या कथेत कोणताही सस्पेन्स, थ्रिल किंवा अॅक्शन-रोमान्स नाही. मात्र, एका अगदी साध्या आणि रोजच्या आयुष्यातील कथेला इतक्या वास्तववादी आणि सुंदर पद्धतीने मांडण्यात आलं आहे की, दीड तास तुम्ही स्क्रीनपासून नजर हटवू शकणार नाही.

इंटरनेटवर चर्चेत आलेला लेटेस्ट चित्रपट

हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच यूट्यूबवर प्रदर्शित झाला असून सध्या इंटरनेटवर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर अनेकजण चित्रपटातील क्लिप्स शेअर करत त्याचं कौतुक करत आहेत. हा चित्रपट दत्तक घेण्याच्या (अॅडॉप्शन) विषयाभोवती फिरतो. एका अशा मुलीची ही कथा आहे, जी आपल्या मुळांपासून दूर जाण्यास नकार देते.

कादंबरीवर आधारित आहे चित्रपट

आम्ही ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, त्याचं नाव ‘अ मॉस्किटो इन द ईअर’ (A Mosquito in the Ear) आहे. या चित्रपटाची कथा निकोला रिंसियारी यांनी लिहिली असून, त्यांनीच या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे. दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे.हा चित्रपट ‘उना जांजारा नेल’ओरेचियो’ (Una Zanzara nell’Orecchio) या ग्राफिक नॉव्हेलवर आधारित आहे. चित्रपटात जेक लेसी, नाजनीन बोनियादी आणि रूही पाल यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

‘अ मॉस्किटो इन द ईअर’ चित्रपटाची कथा काय?

हा चित्रपट एका अमेरिकन दाम्पत्याभोवती फिरतो. प्रजननाशी संबंधित समस्यांनंतर हे दाम्पत्य इंटरनॅशनल अॅडॉप्शनच्या माध्यमातून गोव्यातील एका अनाथ आश्रमातून चार वर्षांच्या भारतीय मुलीला दत्तक घेतात. वेगवेगळ्या देशांतून आणि समुदायांतून आलेले असूनही, या कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाची कमतरता नसते. मात्र, त्यांच्यासमोरची सर्वात मोठी अडचण असते ती भाषेची.

मुलीला इंग्रजी येत नसतं, तर तिच्या आई-वडिलांना हिंदी येत नसते. त्यामुळे तिघांना नीट संवाद साधता येत नाही. सरवरी नावाची ही मुलगी आतापर्यंत ज्या घरात, समाजात आणि भाषेच्या वातावरणात वाढली आहे, ते सगळं सोडून जाण्यास नकार देते. अशा परिस्थितीत हे अमेरिकन दाम्पत्य या पेचातून कसा मार्ग काढतं, याभोवती चित्रपटाची कथा फिरते.

यूट्यूबवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे चित्रपट

हा चित्रपट इंग्रजी आणि हिंदी भाषेत यूट्यूबवर उपलब्ध आहे. चित्रपटाची कथा प्रेक्षकांना आवडत असून, त्यातील काही प्रसंग भावुक करणारे आहेत. मात्र, त्याचवेळी हे प्रसंग पाहताना मनाला समाधान आणि एक वेगळाच आनंदही मिळतो.