गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अभिनेत्री अदिती पोहनकर आणि अभिनेता भूषण पाटील यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘पाहिले मी तुला’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित केले आहे. हा चित्रपट ४ ऑगस्ट २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
कौटुंबिक नाटय़ असलेल्या या चित्रपटात आयुष आणि अलिशा यांच्या भूमिकेतील भूषण आणि अदिती यांची प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक मनोज कोटियान सांगतात, ‘आपापल्या दैनंदिन जीवनात व्यग्र असलेल्या लोकांना प्रेमाच्या माध्यमातून ताजंतवानं करणारा हा चित्रपट आहे. या कथेद्वारे अशा लोकांना काही क्षणांसाठी का होईना आनंदी करायचं आहे.’ तर चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अदिती पोहनकर म्हणाली, ‘मी या चित्रपटाबाबत खूपच उत्सुक आहे. नाटय़मय वळणांची ही खूप गोड आणि भावगर्भ प्रेमकथा आहे. ’ चित्रपटाची कथा सारंग पवार आणि सुशील पाटील यांची आहे. पटकथा आणि संवादलेखन अभय अरुण इनामदार यांनी केलं आहे. मनोज कोटियान दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती निर्माते सुशील पाटील, नीलेश लोणकर, अरिवद राजपूत यांनी एनएसके श्री फिल्म्स इंटरनॅशनलच्या बॅनरखाली केली असून सिनेमास्टर्स एन्टरटेन्मेंट प्रस्तुतकर्ते आहेत. या चित्रपटात भूषण पाटील, अदिती पोहनकर, उदय टिकेकर, अतुल तोडणकर, सुहास परांजपे, माधव अभ्यंकर, शुभांगी लाटकर, सुहास परांजपे आणि अमृता पवार यांच्या भूमिका आहेत.