Aadu 3 Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर सध्या ‘धुरंधर २’ ची जोरदार चर्चा आहे. पण असं असतानाही एका छोट्या मल्याळम चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. ‘आडू ३’ (Aadu 3) असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला तब्बल ८२.५० कोटींची जबरदस्त कमाई केली. नंतर, सोमवारी (२३ मार्च) आणखी ६.४० कोटींचा गल्ला जमवला आहे. या फँटसी कॉमेडी चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या ५ दिवसांत जगभरात एकूण ८८.९० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

‘आडू ३’ या चित्रपटाच्या एकूण कमाईपैकी सुमारे ३१ कोटी रुपयांचे कलेक्शन केरळमधून केले आहे, तर उर्वरित ५८ कोटी रुपये इतर राज्ये व जगभरातीतून कमावला आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटाला मध्य पूर्वेकडील देशांतही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचे सध्याचे कलेक्शन पाहता, हा मल्याळम चित्रपट जगभरात १०० कोटींचा टप्पा लवकरच ओलांडणार, असं दिसत आहे.

‘आडू ३’ ने ५ दिवसांत किती कलेक्शन केले? वाचा…

‘आडू ३’ ने पहिल्या दिवशी १८ कोटी रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली आणि या सिनेमाने २४.६५ कोटींचा गल्ला जमवला. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने २३.६५ कोटी रुपये, चौथ्या दिवशी १६.२० कोटी रुपये आणि पाचव्या दिवशी ६.४० कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.

Award Banner

‘आडू ३’ चित्रपटाची कथा

‘आडू ३’ (Aadu 3) हा चित्रपट ‘आडू’ सिरीजचा तिसरा भाग असून याची कथा अत्यंत विनोदी आहे. यात अनेक विचित्र प्रसंग दाखवण्यात आले आहेत. चित्रपटात पुन्हा एकदा शाजी पाप्पन (जयसूर्या) आणि त्याची अतरंगी मित्रांची टोळी आहे. शाजी पाप्पनला सतत कंबरदुखीचा त्रास असतो, पण तरीही तो संकटात अडकलेल्या आपल्या मित्रांसाठी धावून जातो. शाजी पाप्पन आणि त्याची टोळी एका अशा मोहिमेवर निघते, जिथे त्यांचा सामना काही अलौकिक शक्तींशी होतो.

‘आडू ३’ चित्रपटातील कलाकार

या चित्रपटात जयसूर्या, सायजू कुरुप, विनायकन, सनी वेन, धर्मजन बोलगाटी, विजय बाबू, भगत मॅन्युअल व हरिकृष्णन या कलाकारांची मांदियाळी आहे. तसेच एलेया बॉर्न आणि कृष्णा जीव या नवीन कलाकारांनीही यात उत्तम काम केलं आहे. अभिनेत्री वेदिका एका डान्स नंबरमध्ये झळकली आहे.

मिधुन मॅन्युअल थॉमस यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून, ‘फ्रायडे फिल्म हाऊस’ आणि ‘काव्या फिल्म कंपनी’च्या बॅनरखाली याची निर्मिती करण्यात आली आहे.