scorecardresearch

Premium

‘आली तर पळापळ’ : अस्पृश्य विषयाची रंजक पेशकश

नाटकाचं नेमकं कार्य काय, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो.

‘आली तर पळापळ’ : अस्पृश्य विषयाची रंजक पेशकश

|| रवींद्र पाथरे

नाटकाचं नेमकं कार्य काय, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. प्रेक्षकांचं रंजन करणं हे जरी नाटकाचा पहिला उद्देश असला तरी त्यापलीकडे कला म्हणून नाटकाकडून आणखीन खूप अपेक्षा आहेत. समाजप्रबोधनाबरोबरच मनुष्याला भेडसावणाऱ्या मनोकायिक समस्या, सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक तसंच कलेसंबंधीचे प्रश्न मांडणं (जमल्यास त्यांची उत्तरं देणं!), भोवतालच्या घटना-घडामोडींचा वेध घेऊन त्यावर प्रतिक्रिया देणं.. असं बरंच काही नाटकाच्या कक्षेत येतं. अर्थात हे करताना प्रेक्षकांचं रंजनही महत्त्वाचं आहेच. मग ते बौद्धिक असो, भावनिक वा मानसिक पातळीवरचंही असू शकेल. नाटय़प्रयोगात कलात्मकता अनुस्यूतच आहे. काही नाटकांमध्ये प्रश्न वा समस्या रंजनाच्या शर्करावगुंठित पद्धतीनं पेश केली जाते. त्यामुळे ती व्यापक जनसमुदायापर्यंत पोहोचू शकते. लोककलांमध्ये हा मार्ग उत्तमरीत्या वापरला जातो. त्याने ती समस्या वा प्रश्न अधिक लोकांपर्यंत पोहोचायला मदत हते.

अशा तऱ्हेचं एक नाटक नुकतंच रंगमंचावर आलं आहे. त्याचं नाव: ‘आली तर पळापळ’! यापूर्वी ते ‘बायकांना का नाही?’ या नावानं रंगभूमीवर आलं होतं. परंतु काही कारणास्तव त्याचे फार प्रयोग होऊ शकले नव्हते. आता नव्यानं ते नाव बदलून आलं आहे. स्त्रियांच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची समस्या बिनधास्तपणे मांडणारं हे नाटक आहे. लोकनाटय़ाच्या फॉर्ममध्ये ते सादर होतं. ‘नाटकातलं नाटक’ हा आणखी एक उपप्रकार त्यात योजलेला आहे. मोकळ्याढाकळ्या फॉर्ममुळे नाटक रंजक तर झालं आहेच; शिवाय लवचीक अन् गतिमानही झालं आहे. एक हौशी नाटय़ग्रुप.. खरं तर त्या ग्रुपचा दिग्दर्शक स्त्रियांच्या स्वच्छतागृहांच्या समस्येवरील एक नाटक बसवायला घेतो. पण सार्वजनिक ठिकाणी ज्याचा उच्चारही वज्र्य मानला जातो असा हा विषय नाटकातून मांडायला कलावंत राजी नाहीत. स्त्रियांच्या स्वच्छतागृहांची समस्या हा विषय नाटकाचा असूच शकत नाही, असं त्यांचं म्हणणं असतं. शिवाय, अशा विषयावरील नाटकात आपण काम करतो, हे घरच्यांना कोणत्या तोंडानं सांगायचं, हाही त्यांच्यासमोर कळीचा प्रश्न आहे. दिग्दर्शक मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे.. याच विषयावर नाटक करायचं म्हणजे करायचं! समाजातील निम्म्या घटकाच्या (पक्षी : स्त्रियांच्या!) आरोग्यासह सर्वागीण कुचंबणेला वाचा फोडणारा हा विषय नाटकातून मांडायचा नाही तर मग कशातून, असा त्याचा सवाल असतो. एक स्त्री-कलाकार मात्र हा विषय नाटकाद्वारे मांडायची कल्पना उचलून धरते. त्याचं महत्त्व इतरांना पटवून देते. हळूहळू सर्वानाच तो विषय किती दाहक आहे हे पटतं. त्याची उदाहरणं त्यांच्या आसपास.. अगदी त्यांच्या घरातल्या स्त्रियांच्या बाबतीतही घडताना ते पाहतात. स्वच्छतागृहांच्या अभावामुळे महिलांची जी कुचंबणा व कुतरओढ होते ती त्यांच्या अनुभवातलीच असते. वगनाटय़रूपात ही समस्या मांडायचं ठरतं. साहजिकच त्यात गण, गवळण, बतावणी, वग आला. अन् त्यातून होणारं प्रेक्षकांचं मनोरंजनही!

आटपाट नगरीच्या एका राजाकडे राज्यातील स्त्रिया स्वच्छतागृहांच्या समस्येबद्दलचं निवेदन घेऊन मोर्चानं येतात. राजा नेहमीप्रमाणेच त्यांची ही मागणी गांभीर्यानं घेत नाही. परंतु राज्याचे प्रधानजी संवेदनशील असतात. ते राजाला सल्ला देतात, की आपण प्रत्यक्ष पाहणी करूनच वस्तुस्थिती समजून घ्यावी. त्याकरता प्रधानजी राजाला शहरं, गावं आणि झोपडपट्टय़ांतून फिरवतात. झोपडवस्तीत राहणाऱ्या स्त्रियांची व्यथा-वेदना तर सर्वात भीषण असल्याचे त्यांना आढळून येते. सार्वजनिक स्वच्छतागृहांची मूलभूत सोय नसल्याने महिलांचे काय हाल हाल होतात, त्यातून त्यांचे आरोग्य आदी प्रश्न कसे उद्भवतात, आणि त्याचे गंभीर दुष्परिणाम आपल्या भावी पिढय़ांवरही कसे होऊ शकतात, याचं वास्तव दर्शन प्रधानजी राजाला घडवतात. अर्थात त्यातून ते प्रेक्षकांनाही घडतं. आणि एका अत्यंत महत्त्वाच्या समस्येस वाचा फुटते.

राजेश कोळंबकर या अतिशय संवेदनशील लेखकाचं हे नाटक. एका वर्जित विषयावर नाटक लिहून ते रंगमंचावर आणण्याचं साहस केल्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. त्यांनी या विषयाचे सर्वागीण पैलू या नाटकात मांडले आहेत. दिग्दर्शक अक्षय अहिरे यांनीही हा ‘अस्पृश्य’ विषय सादर करताना प्रेक्षकांना त्याची शिसारी येणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली आहे. ‘राइट टू पी’ चळवळ आता आपल्याकडे बऱ्यापैकी फोफावली आहे. परंतु या चळवळीची म्हणावी तितकी दखल मात्र अद्यापि आपल्या शासनकर्त्यांनी घेतलेली नाही. अन्यथा हा प्रश्न केव्हाच मार्गी लागला असता. अध्र्या लोकसंख्येला भेडसावणाऱ्या या भीषण समस्येकडे आणि त्याच्या दुष्परिणामांकडे शासनाचे दीर्घकाळ दुर्लक्ष व्हावे, यातून आपल्या शासनकर्त्यांची असंवेदनशीलताच दिसून येते. छोटे छोटे प्रसंग, त्याद्वारे महिलांच्या स्वच्छतागृहाच्या समस्येतील सगळ्या कळीच्या मुद्दय़ांना घातलेला थेट हात- आणि हे करत असताना मनोरंजनाची न सोडलेली कास.. ही या प्रयोगाची वैशिष्टय़े होत. सर्वच कलाकारांनी अनेक भूमिका साकारल्या आहेत. त्याही अस्सलतेनं. त्यात दिग्दर्शकाचं योगदानही अतिशय मोलाचं. स्वच्छ, सुरक्षित व मोफत महिला स्वच्छतागृहांची मागणी इतक्या प्रभावीपणे अगणित लेख लिहून, आंदोलने करून, सरकारला धारेवर धरूनही मांडता आली नसती; जे या नाटकानं केलं आहे. त्यासाठी लेखक, दिग्दर्शक, निर्माते, कलावंत व तंत्रज्ञ असे सारेच कौतुकास पात्र आहेत. सचिन गोताड यांनी नाटकाची मागणी पुरवणारं कल्पक व लवचीक नेपथ्य केलं आहे. प्रवीण डोणे यांचं संगीत नाटकाची रंजकता वाढवतं. प्रवीण डोणे (हार्मोनियम) आणि साहिल तांबे (ढोलकी) यांची साथही उत्तम. अनिकेत जाधव यांच्या नृत्यआरेखनानं नाटकात बहार आणली आहे. अक्षय जाधवांच्या पाश्र्वसंगीतानं नाटकातील विषयाचं गांभीर्य गडद होईल, ही दक्षता घेतली आहे. निलेश कदम यांच्या प्रकाशयोजनेनं या वगनाटय़ाची खुमारी आणखीन वृद्धिंगत झाली आहे. अनिल आरोस्कर (रंगभूषा) आणि अक्षय अहिरे (वेशभूषा) यांनी कलावंतांना विविध भूमिका अस्सलतेनं साकारायला मोठी मदत केली आहे.  दीपा माळकर, स्नेहा पराडकर, प्रियांका सातपुते, रंजना म्हाब्दी यांनी वगनाटय़ातील गवळणींसह विविध पात्रं, त्या प्रत्येकाच्या वेगळ्या लकबी, दिसणं, असणं, व्यक्त होणं हे सहजतेनं साकारलं आहे. तीच गोष्ट पुरुष कलावंतांची. सुशील पवार, सचिन वळंजू, नितीन जंगम आणि सुरेश तांबे यांनी निरनिराळ्या भूमिकांचं वजन त्यांच्या मागणीनुसार पेललं आहे. त्याकरता आवाजातला बदल, संवादफेक, देहबोली आणि कृती यांचा समन्वय साधून ते बदल सफाईनं आत्मसात केले आहेत. रंगभूमीवरील प्रदीर्घ अनुभवामुळे प्रदीप पटवर्धन नाटय़ग्रुपचे दिग्दर्शक आणि खुशालचेंडू राजाच्या भूमिकेत सहज वावरले आहेत.

एकुणात, एका महत्त्वाच्या, पण अस्पर्श विषयावरील हे नाटक मनोरंजन तर करतंच करतं; पण त्याचबरोबर प्रेक्षकांच्या डोळ्यांत जळजळीत अंजनही घालतं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aali tar pala pal marathi natak

First published on: 08-07-2018 at 03:52 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×