पंचवीस वर्षांपूर्वी ज्या गाण्याने अवघ्या तरूणाईला वेड लावले होते त्याच ओळी आज पुन्हा फिल्मसिटीत घुमल्या. तेव्हा ऐन पंचविशीच्या उंबरठय़ावर असलेल्या ‘राज’ने गिटार घेऊन ‘पापा कहते है बडा नाम करेगा..’ म्हणत तरूणाईला काबीज केले होते. आता पन्नाशीच्या उंबरठय़ावर असणारा ‘राज’ अर्थात आमिर तेच गाणे गुणगुणत ‘के मेरी मंझिल है कहॉं…’ या ओळीशी येऊन थांबला. ‘आजही खरे म्हणजे मी माझी मंझिल कोणती आहे याचा शोध घेतोय’, क्षणभर रेंगाळलेला आमिर बोलता झाला. कारकिर्दीत यश महत्वाचे असतेच, पण अपयशाच्या क्षणांनीच आपल्याला बरेच काही शिकविले, अशी निर्मळ कबुलीही त्याने दिली.
१९८८ साली आलेल्या ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातून नायक म्हणून आमिरने आपल्या कारकि र्दीची सुरूवात केली होती. या चित्रपटाला आणि त्यानिमित्ताने आपल्या कारकिर्दीला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानने दादासाहेब फाळके चित्रनगरीत (फिल्मसिटी) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. माझ्या चुकांमधून मी खूप काही शिकलोय. अनेक भूमिका अपयशी ठरल्या तरी त्यातून मी काहीतरी शिकलो. एकावेळी एकच चित्रपट या वृत्तीमुळे फार काळ चित्रपटसृष्टीत माझा निभाव लागणार नाही असे भाकीतही अनेकांनी वर्तविले होते, पण मी मला योग्य वाटले तेच केले, असे आमीरने ठामपणे नमूद केले.
‘जुनून आणि जोश’ ही माझे बलस्थाने आहेत. जिद्दीपणामुळे मला ताकद मिळते. परंतु, एखादे चुकीचे पाऊल उचलले गेले तर ही बलस्थाने कमजोरीही ठरू शकतात याचे भानही मी ठेवले. ‘तारे जमीं पर’ चित्रपटासाठी संशोधन खूप केले. त्यावेळी एका डॉक्टरला भेटून लहान मुलांना कसे जपायचे याबद्दल मी विचारले होते. तेव्हा डॉक्टर म्हणाले की, सुरक्षितता, विश्वास, सन्मान आणि प्रेम या चार गोष्टी लहान मुलांना द्यायला हव्यात. नंतर याबाबत विचार करताना जाणवले की या चार गोष्टींची मलासुद्धा खूप गरज आहे. विशेषत: दुरावलेले नातेसंबंध सुधारायचे असतील तर या चार गोष्टीं फार मोलाच्या आहेत, असा अनुभव आपल्याला आल्याचेही आमिरने यावेळी सांगितले.
‘भारतीय चित्रपटाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीत मी पण हिस्सेदार आहे, याचा मला आनंद आहे. खरेतर सिनेमाच्या शताब्दीनिमित्त आपणच एक स्वतंत्र पूर्ण लांबीचा चित्रपट करावा, अशी माझी इच्छा होती. मलाही काहीतरी वेगळे करायला आवडले असते. परंतु, हा विचार मला आधी सुचला नाही आणि तशी सवडही मिळाली नाही, असे त्याने सांगितले. सर्वाधिक प्रभाव टाकणारी फिल्मी व्यक्ती कोण?, असे विचारताच एका क्षणात ‘मधुबालाचे हास्य’ असे सांगून आमिर मोकळा झाला.
‘कयामत’चा पहिला अपशकुन ठरला भाग्याचा..